आंघोळीचा मार्ग आपल्या हृदयाचे आरोग्य ठरवतो. असे बरेच लोक आहेत जे अत्यंत थंडीतही थंड पाण्याने आंघोळ करतात जे धोकादायक ठरू शकतं. तर दुसरीकडे, काही लोक थंडीत खूप गरम पाण्याने आंघोळ करतात आणि हे आपल्या हृदयासाठी धोकादायक देखील ठरू शकते. थंडीमुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तदाब वाढतो. यामुळे आपल्या हृदयावर अतिरिक्त दबाव पडतो. अशा परिस्थितीत थंड किंवा गरम पाण्याने आंघोळ करणे धोकादायक ठरू शकते
कोमट पाण्याने आंघोळ करणे सुरक्षित
आरोग्य तज्ञांच्या मते, कोमट पाणी आपल्या शरीराला अचानक झटका देत नाही आणि ते शरीराचे तापमान राखते. खरंतर, कोमट पाणी शरीराचे तापमान वाढवते आणि रक्ताभिसरण वाढवते. हिवाळ्यात जेव्हा आपण थंड पाण्याच्या संपर्कात येतो तेव्हा संपूर्ण शरीर थरथर कापते. डॉ. करुण बहल, हृदयरोगतज्ज्ञ, फोर्टिस हॉस्पिटल, मोहाली म्हणतात, 'जेव्हा आपण थंड पाण्याच्या संपर्कात येतो, तेव्हा आपत्कालीन परिस्थिती असल्याप्रमाणे आपले शरीर प्रतिक्रिया देते.
रक्ताभिसरण जलद होते आणि बाकीच्या अवयवांचे रक्षण करण्यासाठी आपले हृदय देखील जलद रक्त पंप करू लागते. अशा आपत्कालीन परिस्थितीत हृदय त्वचेजवळील रक्ताभिसरण थांबवते, ज्यामुळे आपण थरथर कापू लागतो. आणि जेव्हा आपण थरथर कापतो तेव्हा ते हृदयावर अधिक दबाव टाकते. त्याचबरोबर अनेक संशोधनांमध्ये हे समोर आले आहे की, हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ केल्याने चयापचय आणि रोगप्रतिकारशक्ती वाढते. हे लक्षात घेऊन, अनेक फिटनेस फ्रिक हिवाळ्यात थंड पाण्याने आंघोळ करतात, परंतु ते हे विसरतात की अशा चाचण्यांमध्ये पूर्णपणे तंदुरुस्त अशा लोकांचा समावेश होतो ज्यांना कोणताही आजार नाही.
डॉ बहल म्हणतात, 'जेव्हा तुम्ही थंड पाण्याने आंघोळ करता तेव्हा तुमच्या हृदयावर अतिरिक्त ताण येतो. यामुळे आपल्या हृदयाचे ठोके अनियमित होतात आणि आपल्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. त्याचप्रमाणे थंडीच्या दिवसात अचानक गरम पाण्याने अंघोळ केल्याने रक्तदाब झपाट्याने कमी होऊन हृदयावर ताण वाढतो. म्हणूनच हिवाळ्यात आंघोळीसाठी कोमट पाण्याचा वापर करावा. पाय धुवून आंघोळीला सुरुवात करा आणि आंघोळीनंतर लगेच अंगाला टॉवेल गुंडाळा.
हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी काय करावे?
डॉ बहल सांगतात, 'हिवाळ्यात हृदयविकाराचा धोका कमी करण्यासाठी हलके अन्न खावे, पुरेसे लोकरीचे कपडे घालावेत. व्यायाम करावा आणि कोणत्याही प्रकारचा आजार असल्यास नियमित औषध घ्यावे. काहीवेळा अशा हवामानात उच्च रक्तदाबाच्या रुग्णांना औषधाच्या जास्त डोसची आवश्यकता असते. म्हणूनच हृदयरोगतज्ज्ञांचा नियमित सल्ला घेत राहा. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"