लंडन - आपल्याला सतावणारी चिंता, नैराश्य, संताप हा काही वेळ एकांतात राहिल्याने कमी होतो, असे ब्रिटनमधील डरहम विद्यापीठातील प्राध्यापक थ्यू-वी गुयेन यांनी केलेल्या प्रयोगांत आढळून आले आहे. त्यांनी काही युवकांना १५ मिनिटे एकांतात राहण्यास सांगितले. त्या कालावधीतील त्यांच्या मानसिक स्थितीचा अभ्यास करून हे निष्कर्ष काढले आहेत.
थ्यू-वी गुयेन यांनी म्हटले आहे की, एकट्याने वेळ घालविणे हे अनेकांना आवडत नाही. पण एकांत व एकटेपणा यांच्यात अनेकदा गल्लत केली जाते. काहीजण अविवाहित असतात, काहीजणांना मुलबाळ नसते, मुले दुरावलेली असतात अथवा सर्व असूनही स्वभावामुळे नातेवाईक दुरावलेले असतात, अशा लोकांना एकटेपणा जाणवतो. एखादी व्यक्ती रोज काहीवेळ एकांतात राहिली तर ती स्थिती तिला आपल्या भावनांवर नियंत्रण राखण्यासाठी लाभदायक ठरू शकते.
असा केला प्रयोगडरहम विद्यापीठातील प्राध्यापक थ्यू-वी गुयेन यांनी काही विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाला एका खोलीत १५ मिनिटे एकांतात बसण्यास सांगितले. या कालावधीत विद्यार्थ्यांचे मन शांत झाले होते. ज्यांच्या मनात काही गोष्टींविषयी राग, द्वेष होता तो कमी झाला होता. यातील काही विद्यार्थी सोबत काहीही वस्तू न घेता एकांतात बसले होते. तर काही विद्यार्थ्यांना बॅग, मोबाईल घेऊन, तर काहीजणांना मोबाईल, पुस्तक घेऊन १५ मिनिटे एकांतात वेळ घालविण्यास सांगण्यात आले. त्यातून लक्षात आले की, या विद्यार्थ्यांनी सतावणाऱ्या चिंतेबाबत फार विचार केला नाही. त्यांनी एकांतात आवडणाऱ्या गोष्टींमध्ये मन रमविले व त्यांच्यात उत्साह संचारला.