(Image Creadit : birchbox.com)
दाढी करण्यासाठी रेझरचा वापर करणं ही फार सामान्य बाब आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? तुम्ही रोज वापरणारा रेझर अनेक गंभीर आजारांचं कारण ठरू शकतं. त्यामुळे दररोज वापरण्यात येणारं रेझर स्वच्छ असणं गरजेचं आहेच. त्याचबरोबर तुम्ही वापरत असलेलं रेझर इतर लोकांसोबत शेअर करणं टाळावं. जर चुकूनही हे रेझर कोणी वापरलं तर अनेक गंभीर आजारांचा सामना करावा लागू शकतो. जाणून घेऊयात शेविंग रेझरमुळे होणाऱ्या गंभीर आजारांबाबत...
स्किन इन्फेक्शन
सध्या बाजारामध्ये अनेक प्रकारचे रेझर उपलब्ध असतात. त्यातील काही फक्त एकदा वापरून फेकून देण्यात येतात. तर काही बऱ्याचदा वापरता येणारे असतात. तुम्ही त्यातील वन टाइम यूज रेझरचा वापर करत असाल तर ठिक आहे, पण जर तुम्ही अनेकदा वापरता येणारं रेझर वापरत असाल तर मात्र तुम्हाला अधिक काळजी घेणं गरजेचं असतं. दाढी करून झाल्यानंतर ते व्यवस्थित स्वच्छ करणं गरजेचं असतं. जर व्यवस्थित स्वच्छ केलं नाही तर अनेक सूक्ष्म किटाणू यामध्ये वाढण्याची शक्यता असते. यामुळे अस्वच्छ रेझरचा वापर करण्याऱ्या व्यक्तिला फंगल इन्फेक्शन किंवा यीस्ट इन्फेक्शन होण्याची शक्यता असते.
फॉलिक्युलाइटिस
ही एक केसांशी निगडीत समस्या आहे. हा आजार दुसऱ्याने वापरलेलं रेझर वापरल्यानं होतो. यामध्ये त्वचेला खाज येते आणि जखमाही होऊ शकतात. यामुळे दुसऱ्याने वापरलेलं रेझर वापरणं टाळावं.
एमएसआरए
हे एक गंभीर संक्रमण असून यामुळे अनेकांना आपला जीवही गमवावा लागला आहे. याचं मुख्य कारण एकापेक्षा अधिक लोकांमध्ये रेझर शेअर करणं हे आहे. या रोगामध्ये त्वचेला सूज येते आणि त्वचेचा तो भाग लाल होतो. या संक्रमणामध्ये ताप येण्यासोबतच ज्या ठिकाणी इन्फेक्शन झालं आहे त्या जागेवर जखमा होऊन जखमांना पाणी सुटतं. त्यामुळे जखमा चिघळतात.
हेपेटायटिस
जर एका रेझरने एकापेक्षा अधिक लोकं शेविंग करत असतील तर, त्यांना हेपेटायटिस रोगाचा सामना करावा लागतो. त्यामुळे इतर कोणीतरी वापरलेलं रेझर वापरणं शक्य तेवढं टाळावं. याशिवाय दुसऱ्याने वापरलेलं रेझर वापरण्याशिवाय पर्याय नसेल तर ते गरम पाण्यात टाकून स्वच्छ करून घ्यावं.