पुणे :मुलांनी एका जागी बसावं म्ह्णून त्यांना व्हिडीओ दाखवणाऱ्या पालकांसाठी धक्कादायक बाबी समोर आल्या असून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मात्र तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
कशी होते सुरुवात ?
- कोणतेही लहान मुल म्हटले की ते चुळबुळ करणारच. जेवताना एका जागी बसायचे असते, दुसऱ्याकडे गेल्यावर शांत बसायचे असते हे कळण्याचे मुलांचे वय आणि समज नसते. अशावेळी पालक पटकन दृक श्राव्य व्हिडीओ किंवा क्लिप दाखवून त्यांना गुंतवून ठेवतात.
- मुलांना एका जागी कमी कष्टात आणि कमी पैसे खर्च करून बसवण्याची सोय करत पालक आपली कामे करतात. सुरुवातीला जेवताना किंवा तात्पुरत्या स्वरूपात लावलेली ही सवय हळूहळू त्यांचे व्यसन बनत जाते आणि पुढे येतात या अडचणी..
व्हिडीओ बघण्याची सवय आणि तोटे
- अगदी दोन ते तीन वर्षांचे मुलंही प्रत्यक्ष शारीरिक हालचाली करण्यापेक्षा गेम खेळण्यात धन्यता मानते. यामुळे त्यांचे शारीरिक वजन वाढत असून बौद्धिक विकासही कमी होतो. दुसरीकडे पालकही त्रास वाचत असल्यामुळे समाधानी असतात. काही पालक तर माझे मुल छान मोबाईल हाताळते याचे कौतुक करतात. मात्र, नकळत्या वयात मुलांच्या हातात आपण मोबाइलरूपी दुधारी शस्त्र देत आहोत हे ते लक्षातही घेत नाहीत.
- काही काळाने मुलाला मोबाईल दिला नाही तर ते चिडचिड करतात, हात पाय आपटतात, आई वडिलांच्या अंगावर धावून जातात. इतकेच नाही तर कार्टून किंवा तत्सम कार्यक्रम लावल्याशिवाय जेवणार नाही असाही हट्ट सुरु होतो.
- मुलाला जडलेल्या या सवयीची जाणीव पालकांना तेव्हा होते जेव्हा ते कुठेही रमत नाही. अगदी एकाच वयाचे सोबती खेळायला असतानाही एखादा मुलगा मोबाईल मागत असेल तर त्याला मोबाईलची सवय तर जडली नाही ना हे तपासण्याची गरज आहे.
असा घडवा बदल :
- मुलांना हळूहळू स्थिर बसण्याची सवय लावा. पण ते तुमच्याइतके एकाग्र ते होणार नाहीत हे लक्षात घ्या.
- सुरुवातीला दहा मिनिटांनी सुरुवात करून हळूहळू हा वेळ वाढवत न्या.
- मुलांना गोष्टी सांगत आणि विविध घटना किंवा माहिती सांगत त्यांचा रस वाढेल अशा गप्पा मारा.
- घरातल्या चर्चेत त्यांना सहभागी करून घ्या.
- मोबाईलची सवय एका दिवसात गेली नाही तरी त्याचे तोटे सांगत असलेला व्हिडीओ त्यांना जरूर दाखवा.
- छोटी-छोटी गोष्टीची पुस्तक वाचून दाखवा.
- त्यांची ऊर्जा खर्च होण्यासाठी खेळायला आवर्जून पाठवा. सापशिडीसारख्या खेळात त्याच्यासोबत सहभागी व्हा.
- अगदीच सवय जात नसेल तर रोज अर्धा तास त्याला खेळायला फोन द्या आणि हळूहळू ही सवय काढून टाका.
- त्याला अभ्यासात किंवा वाचनात रमवून तुम्ही मोबाईल खेळत बसू नका.
तज्ज्ञ सांगतात की,
- याबाबत बाल मानसिकतेच्या अभ्यासक विद्या साताळकर म्हणतात की, मोबाईल मुलांना मोबाईल दिल्यामुळे त्यांची कल्पना शक्ती कमी होते. वाचनातून 'एक होता भोपळा' म्हटले तर समोर विविध आकाराचा भोपळा येतो. मात्र तसा व्हिडीओ बघितल्यास त्यांना भोपळा कसा असतो हे विचार करण्याची गरज उरत नाही आणि परिणामी मेंदू आळशी बनत जातो आणि कल्पनाशक्तीचा विकास होत नाही.