रक्तातील अशुद्ध व टाकाऊ द्रव्यपदार्थ किडनीद्वारे गाळले जावून लघवीवाटे शरीराबाहेर टाकले जातात. युरीनमध्ये टॉक्सिन्स,बॅक्टेरिया,अतिरिक्त प्रोटीन्स आणि साखर यांचा समावेश असतो. कोणताही आजार अगदी साधा ताप आला तरी डॉक्टरांकडे जातो आणि डॉक्टर आपल्याला युरीन टेस्ट करायला सांगतात. आपण टेस्ट करतो मात्र पण ही टेस्ट आपल्याला कशाला करायला सांगितली आहे, त्यामागचं कारण काय आहे, हे मात्र आल्याला कळत नाही. खरं म्हणजे युरीनच्या रंगावरून आपल्याला नेमका काय आजार झाला आहे याची डॉक्टरांना कल्पना येते. द हेल्थ साईट या संकेतस्थळावर लघवी पिवळी होण्यामारे काय कारणे असू शकतात याची माहिती दिली आहे.
उन्हाळ्यात घाम अधिक येतो आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते त्यामुळे या दिवसात लघवीत क्षारांचे प्रमाण अधिक असते. उन्हाळ्यात जास्त काम, व्यायाम केल्यामुळे, पाणी कमी प्यायल्यामुळे लघवी पिवळी होण्याचा त्रास होतो.
काहीवेळा औषधांमुळे लघवीचा रंग पिवळा होतो. बरेचदा अँटिबायोटिक्स घेतल्यामुळेही लघवीचा रंग बदलतो. लघवी करताना कोणताही त्रास किंवा जळजळ होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घेण्यास सुरुवात करायला हवी.
काहीवेळा बाहेरचे तसेच उघड्यावरचे अन्न खाल्ल्याने लघवीचा रंग पिवळा असतो. हे खाण्यातील घटकांमुळे होऊ शकते. जंक फुड, डबाबंद पदार्थ यातील ते पदार्थ टिकवून ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पदार्थांमुळे लघवीचा रंग पिवळा होऊ शकतो. व्हिटॅमिन बी, सी, बी १२ यामुळेही लघवीचा रंग पिवळा होऊ शकतो.
कावीळमध्येही लघवीचा रंग पिवळा होतो. नवीन रक्त जसजसे तयार होते तसतशा जुन्या रक्तपेशी मोडीत निघतात. यातले रक्तद्रव्य यकृतात विरघळून त्यातून एक पिवळा पदार्थ (बिलिरुबीन) निर्माण होतो. तो पिवळा पदार्थ शौचावाटे बाहेर पडतो म्हणून विष्ठा रंगाने पिवळी असते. या पिवळया पदार्थाचे रक्तातले प्रमाणे वाढणे यालाच'कावीळ' म्हणतात. हा पदार्थ रक्तात प्रमाणाबाहेर उतरल्याने लघवीही जास्त पिवळी दिसते.