- मयूर पठाडेतुम्हाला मित्रमंडळी किती आहेत? तुम्ही त्यांच्यात किती मिसळता? तुमचं सोशल नेटवर्किंग कसं आहे? अर्थातच हे सोशल नेटवर्किंग म्हणजे आॅनलाइन किंवा इंटरनेटवर, सोशल साईट्सवर तुम्ही किती सक्रीय आहात याविषयी नाही. तुमचे खरेखुरे मित्र किती आहेत? शाळा-कॉलेजांत असताना कदाचित असतीलही, पण आता तुम्ही त्यांच्या किती संपर्कात आहात? किती वेळा एकमेकांना भेटता, बोलता? आपल्या सुख-दु:खाच्या किती गोष्टी तुम्ही एकमेकांशी करता? त्यात सहभागी होता?..असं काही तुम्ही करीत असाल, तर ठीक आहे, चांगलंच आहे ते, पण तुम्ही जर आपल्या सोशल नेटवर्किंगमधून आणि मित्रमंडळींपासून दूर गेला असाल, तर तुमच्यासाठी ती धोक्याची घंटा आहे हे लक्षात घ्या.कामानिमित्त आणि रोजच्या जबाबदाºयांमुळे तुम्हाला भले ते शक्य होत नसेल, पण त्याचा दुष्परिणाम तुम्हाला तुमच्या उतारवयात जाणवू शकतो.‘प्लॉस वन’ या प्रतिष्ठित सायंटिफिक जर्नलमध्ये हे संशोधन प्रसिदध झालं आहे. संशोधकांनी नुकतंच असं सिद्ध केलं आहे की, ज्या लोकांना कमी मित्र आहेत, जे त्यांच्यात कमी मिसळतात, त्यांना उतारवयात विस्मृतीचा त्रास तुलनेनं लवकर जडू शकतो. त्यांची आकलनक्षमताही हळूहळू कमी होत जाते, मेंदूच्या संदर्भातील विकारांनी ते त्रस्त होता. जसजसं तुमचं वय वाढत जातं, तसतसं हा त्रास वाढत जाऊ शकतो. वयाच्या ऐंशीनंतर तर तुमच्या स्मृती फारच कमजोर होतात, पण मित्रमंडळींच्या सोबतीत तुम्ही जगत असाल, तर तुम्ही आनंदी राहालच, पण वाढत्या वयाचा तुमच्या शरीरावर कमीत कमी परिणाम होईल.त्यामुळे लक्षात घ्या, आपल्या मित्रमंडळींपासून तुम्ही दूर गेला असाल, तर तातडीनं त्यांच्याशी पुन्हा आपलं मैत्र जुळवा आणि वार्धक्याच्या समस्येपासून स्वत:ला दूर ठेवा.
मित्रांना जपा, नाहीतर वार्धक्यात विस्मृतीचा धोका!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 03, 2017 5:03 PM
केवळ आताच नाही, भविष्यातही कामाला येतात ते केवळ दोस्तच..
ठळक मुद्देमित्रमंडळींपासून तुम्ही दूर गेला असाल, तर तुमच्यासाठी ती धोक्याची घंटा आहे.कामानिमित्त मित्रमंडळींत रमणं तुम्हाला भले शक्य होत नसेल, पण त्याचा दुष्परिणाम उतारवयात जाणवू शकतो.ज्या लोकांना कमी मित्र आहेत, त्यांना उतारवयात विस्मृतीचा त्रास तुलनेनं लवकर जडू शकतो. त्यांची आकलनक्षमताही हळूहळू कमी होत जाते.