जाडेपणा कमी करण्यासाठी कधी कुणी डाएट करतं, कधी कुणी केवळ फळं खातं, कुणी जिम लावतं तर कुणी धावायला जातं. असे वेगवेगळे उपाय अलिकडे प्रत्येक दुसरा किंवा तिसरा व्यक्ती करताना दिसतो. इतकी ही स्थूल होण्याची समस्या गंभीर झाली आहे. याला कारणेही तितकीच वेगवेगळी आहेत. जंक फूड, जेवणाच्या अनियमीत वेळा, प्रमाणापेक्षा जास्त खाणे, शारीरिक हालचाली कमी होणे, व्यायाम न करणे, एकाच जागी बसून काम करणे अशी कितीतरी कारणे सांगता येतील.
जाडेपणा शरीरासाठी वेगवेगळ्या समस्या निर्माण करणारा ठरतो. वेगवेगळ्या आजारांनी तुम्ही ग्रासले जाता. अशात वर दिल्याप्रमाणे फार जास्त मेहनत न घेताही जाडेपणा टाळता येऊ शकतो किंवा कमी करता येऊ शकतो. यासाठी काय करावे लागेल हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
तणावापासून बचाव
जीवनात अनेक चढउतार येत असतात पण त्याचा ताण करुन न घेता शांततेन त्या स्थितीचा सामना करा. जास्त तणावाने जाडेपणा वाढतो आणि याने वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे जाडेपणा कमी करण्यासाठी तणाव टाळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करणे हा चांगला पर्याय आहे.
शुगरला नकार
साखर, मिठाई, चॉकलेट, आयस्क्रीम यांसारख्या गोड पदार्थांवर लोक तुटून पडतात. पण हे गोड पदार्थ पचवण्यासाठी जितकी मेहनत करावी लागते तेवढी केली जात नाही. त्यामुळे गोड पदार्थ एका निश्चित प्रमाणात थेड रक्तात जातात, याने डायबिटीजचा धोका वाढतो. आणि अतिरीक्त कॅलरी शरीरात चरबीच्या रुपात जमा होते आणि हेच जाडेपणाचं कारण ठरतं.
ग्रीन टी फायदेशीर
ग्रीन टी ची टेस्ट फार चांगली असते असे नाही पण याचे फायदे भरपूर आहेत. शरीरातील सर्व विषारी तत्त्व बाहेर काढण्याचे गुण ग्रीन टीमध्ये असतात. तसेच ग्रीन टीमध्ये आढळणारं कॅटेचिन तत्व मेटाबॉलिज्म मजबूत करण्यासाठीही फायदेशीर ठरतं. ग्रीन टीमुळे वजन नियंत्रणात ठेवण्यास आणि कमी करण्यासही मोठी मदत होते.
पाणी जास्त पिणे
जाडेपणा कमी करण्यासाठी पाणी हा सर्वात चांगला पर्याय मानला गेला आहे. भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी तत्त्व बाहेर पडतात आणि याने वेगवेगळ्या आजारांसोबतच वजनही कमी होतं. दिवसातून कमीत कमी १२ ते १५ ग्लास पाणी पिण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
आनंदी रहा
सतत आनंदी राहिल्याने, हसत राहिल्याने आनंदाचे हार्मेन्स रिलीज होतात. या हार्मोन्समुळे वजन कमी होण्यास मदत होते. त्यामुळे नेहमी आनंद आणि हसत राहण्याचा प्रयत्न करा.