नवी दिल्ली - कोरोनाने पुन्हा एकदा थैमान घातले आहे. देशातील रुग्णसंख्येने तब्बल चार कोटींचा टप्पा पार केला असून पुन्हा एकदा कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोनाचा धोका अद्याप टळलेला नाही असा इशारा एक्सपर्ट्स देत आहेत. सध्या लोकांना कोरोनाशी संबंधित नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा सल्ला दिला जात आहे. ज्या वेगाने कोरोना त्याचे स्वरूप बदलत आहे, तितक्याच वेगाने त्याची लक्षणेही बदलत आहेत. आता रुग्णांमध्ये ताप, खोकला, घसा खवखवणे किंवा चव न समजणे, वास न येणे यासारखी कोरोनाची सामान्य लक्षणे दिसत नाहीत. तर अनेक रुग्णांमध्ये केसगळती, कान वाजणे किंवा शिट्टीसारखा आवाज येणे अशी भलतीच लक्षणेही दिसून येत आहेत, ज्याबद्दल तज्ज्ञांनी सर्तकतेचा इशारा दिला आहे.
टिनिटस किंवा कान वाजणे (Tinnitus or Ear Ringing)
आयलँड युनिव्हर्सिटी हॉस्पिटलमधील मेडिसिनचे असोसिएट चेअरमन डॉ. थॉमस गट यांनी अलीकडेच एका हेल्थ वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, कोरोना रुग्णांना टिनिटसची समस्या असू शकते. ही अशी स्थिती आहे ज्यामध्ये रुग्णांच्या कानात घंटेसारखा आवाज येत राहतो. हे लक्षण तिसऱ्या लाटेतही दिसून आले होते.
केसगळती
डॉ. गट यांच्या मते, केसगळती सारख्या समस्याही कोरोना रुग्णांमध्ये दिसू शकतात. जर तुमचे केस अचानक गळू लागले तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. हे सहसा 3 महिन्यांपर्यंत होऊ शकते.
त्वचा सुन्न पडणे
डॉक्टरांनी सांगितले की, अनेक कोरोना रुग्णांमध्ये त्वचा सुन्न पडण्यासारखी लक्षणे दिसून आली आहेत. हे शरीराच्या कोणत्याही भागावर परिणाम करू शकते परंतु सहसा हात किंवा डोके सुन्न होऊ शकते. पण हे लक्षण सहसा काही महिन्यांत स्वतःहून बरे होते.
चक्कर येणं किंवा बेशुद्ध पडणं
डॉ. गट यांनी सांगितले की, कोरोना रुग्णामध्ये चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे यांसारखी लक्षणे देखील दिसू शकतात. या प्रकारचा त्रास रुग्णाला दीर्घकाळ असू शकतो. जर तुम्हाला आधीपासून कोणताही अंतर्गत रोग किंवा अशक्तपणा नसेल, तरीही तुम्हाला हे लक्षणे दिसत असेल तर तुम्ही डॉक्टरांना दाखवावे.
कोरोनाची इतर विचित्र लक्षणे
सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (CDC) नुसार, कोरोनाच्या इतर दुर्मिळ लक्षणांमध्ये बोलण्यात अडचण येणे, पिंक आइज, हात आणि बोटांचा रंग बदलणे इत्यादी लक्षणे समाविष्ट आहेत. तसेच जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत असेल किंवा छातीत दुखत असेल किंवा तर तुम्ही तात्काळ वैद्यकीय मदत घ्यावी. डॉक्टरांचा सल्ला घ्या. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
(टिप- ही माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची शारीरीक स्थिती वेगळी असल्यानं कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.)