डॉ. रचिता धुरत, प्रमुख, त्वचाविकार विभाग, सायन रूग्णालय
पल्याला जोपर्यंत डोक्यावर केस आहेत, तोपर्यंत त्याचे आरोग्य जपण्याबाबत आपण कोणत्याही उपाययोजना करत नाहीत. केसांची निगा राखणे हे बालपणापासून व्हायला पाहिजे. आपण मोठे झाल्यावर केसांबाबत जागे होतो. एकदा का केस गळायला लागले किंवा टक्कल पडायला लागले की मग आपली धावाधाव सुरू होते. त्यातही मग सध्याच्या काळात जाहिरातींमधून केसाचे आरोग्य टिकविण्यासंदर्भात अनेक उपायांचा मारा होत असतो. काही जण त्याचाही अवलंब करून बघतात आणि मग काही झाले नाही की, शेवटी डॉक्टरकडे येतात. त्यामध्ये बराच वेळ निघून गेलेला असतो. त्यामुळे केसांचे आरोग्य धोक्यात आले आहे, असे तुम्हाला वाटते तेव्हा योग्य डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.
विशेष म्हणजे वैद्यकीय उपचारांत आता खूप मोठी प्रगती झाली आहे. आधुनिक औषध उपचार पद्धती आहेत, ज्यामध्ये तुमचे केस गळण्यापासून ते नवीन केस येण्यापर्यंत सर्व काही केले जाते. सध्या हे सर्व उपचार महाराष्ट्रात आणि भारतातही इतर राज्यांत उपलब्ध आहेत. जाहिरातीच्या मागे पळून काहीही होणार नाही. आपण केसाचे आरोग्य समजावून घेतले पाहिजे. आरोग्यदायी केस आणि आजारी केस अशा दोन वर्गवारी केल्या जाऊ शकतात. आपले केस चांगले आहेत, त्यासाठी आपण योग्य पद्धतीने त्याची काळजी घेतली पाहिजे.
पुरुषांनी रोज केस धुतले तरी चालेल त्यासाठी शॅम्पूचा वापर करावा. शॅम्पू सौम्य असावा. तीव्र शॅम्पू केसांच्या मुळांना इजा करू शकतो.
महिलांनी आठवड्यात २ ते ३ वेळा केस धुवावेत. मात्र ज्या महिला धूळ, उष्णता, प्रदूषण असणाऱ्या परिसरात काम करतात. त्यांनी मात्र केस नियमित धुणे गरजेचे आहे, अन्यथा केसांचे आरोग्य बिघडते.
साबणाने केस धुतल्यास केस रुक्ष होतात. तेलाचा वापर म्हणून साधे नारळाचे तेल वापरावे.
‘आजारी केस’ म्हणजे काय?
‘आजारी केस’ म्हणजे नियमितपणे ७० ते १०० केस गळायला लागणे. वेणी छोटी होणे. टप्प्याटप्प्यात टक्कल पडणे. ही लक्षणे असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचे उपचार घेतल्यास त्याचा त्यांना नक्की फायदा होतो. सहा महिन्यांच्या उपचारानंतर जर प्रतिसाद मिळत नसेल तर तो डॉक्टर बदलावा.कारण कुठल्याही उपचारात सहा महिन्यांत प्रतिसाद मिळतोच. प्रतिसाद मिळण्याचे प्रमाण कमी- जास्त असू शकते. तुम्ही कोणत्या टप्प्यावर डॉक्टरांकडून उपचार घेताय हेही फार महत्त्वाचे असते.
काय काळजी घ्यावी?
केसांची निगा राखण्यासाठी संतुलित आहार घ्यावा. रोज व्यायाम करावा. घाम आल्यास तत्काळ पुसावा. शरीर कोरडे ठेवणे गरजेचे आहे.डोक्यावरील घाम हा मुख्य शत्रू आहे. फळभाज्या खाव्यात. सगळ्यांनाच वाटत असते की आपले केस घनदाट आणि चमकदार असावेत. त्यासाठी आहाराची पथ्ये पाळणे गरजेचे आहे. जंक फूड खाऊ नये. प्रसाधने वापरताना काळजी घ्यावी. संबंधित प्रसाधनांचा वापर करावा की नाही, हे डॉक्टरांकडून तपासून घ्यावे. सल्फेट शॅम्पू टाळावेत.