बऱ्याचदा लोकांच्या मनामध्ये या गोष्टीवरून संशय असतो की, दुपारी झोप घेणे चांगले आहे की वाईट? अनेकांना दुपारच्यावेळी झोपण्याची सवय असते, तर अनेक लोकं ही झोप घेणं टाळतात. तसेच अनेक लोकांना दुपारी झोपण्याची इच्छा असते परंतु त्यांच्या कामाच्या रूटीनमुळे त्यांना झोपणं शक्य होत नसून दुपारी जेवल्यानंतर त्यांना आळस येतो. पण जर तुम्ही रोज नित्यनियमाने दुपारी झोप घेत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. दुपारी झोपणे हे आपल्या शरिरासाठी अत्यंत लाभदायक आहे. या गोष्टीला आता वैज्ञानिकांनीही दुजोरा दिला आहे.
युनिवर्सिटी ऑफ पेनसिलवेनियामध्ये सायकलॉजीचे असिस्टंट प्रोफेसर फिलिप यांनी सांगितल्यानुसार, दुपारी घेण्यात येणारी वामकुशी फक्त तुमचा आळस दूर करत नाही तर ती तुमची एकूण ऊर्जाही वाढवते. दुपारी झोप घेतल्यामुळे रोगप्रतिकारशक्ती देखील वाढते आणि यामुळे ह्रदयाचे आरोग्यही चांगले राखले जाते.
15 ते 30 मिनिटांपर्यंतची वामकुशी आळस दूर करण्यासाठी पुरेशी असते. परंतु, जर तुम्ही मानसिकरित्या थकलेले असाल तर तुम्हाला 90 मिनिटे झोप घेणे गरजेचे असते. यावेळेत तुम्ही गाढ झोप घेवून उठू शकता. पण तुम्ही जर झोपेतून अचानक जागे झालात तर तुम्हाला जास्त थकवा जाणवू लागतो.
संशोधनानुसार, वर्कआउटनंतर लगेचच झोपणे शरिरासाठी हानिकारक ठरते. वर्कआउट केल्यानंतर आपल्या मेंदूला चालना मिळते. अशात झोप लागणे शक्य नसते. त्यामुळे वर्कआउट केल्यनंतर कमीत कमी 2 तासांनंतरच झोपावे.
जर तुम्हाला दुपारी झोपण्याची गरज वाटत नसेल तर उगाच झोपू नका. प्रत्येकालाच दुपारच्या झोपेचा फायदा होत नाही. प्रत्येकाच्या शारिरीक गरजा वेगळ्या असतात. काही लोकं दिवस-रात्रीचं चक्र फॉलो करतात त्यामुळे त्यांना दुपारी झोप येत नाही.