हिवाळ्यात सर्दी, खोकल्याचा त्रास बऱ्याच जणांना होत असतो. या दिवसांत वजन वाढण्याची समस्याही उद्भवू शकते. यावर ऋतुमानानुसार शारीरिक आरोग्याकरिता आवश्यक असलेली फळे खाण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. थंडीच्या दिवसांत बाजारात पेरू सहज मिळतात. पेरूमध्ये अँण्टीऑक्सीडंट, जीवनसत्त्व सी, पोटॅशियम, आणि फायबर भरपूर प्रमाणात असते. याव्यतिरिक्त फोलेट आणि लाईकोपीन यासारखी पोषक तत्त्वेही असतात. पेरूमध्ये ८० टक्के पाणी असते. त्यामुळे त्वचा हायड्रेट राहण्याकरिताही पेरू खावेत. पाहूया हिवाळ्यात पेरू खाण्याचे इतर शारीरिक फायदे -
पेरू आणि पेरूच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व सी आणि आयर्न असते. त्यामुळे रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी पेरू खाणे फायदेशीर ठरते. खोकला झाला असेल तर पिकलेला पेरू खाऊ नये, मात्र कच्चा पेरू खाल्ल्याने छातीत जमा झालेला कफ कमी होतो. पेरूमध्ये जीवनसत्त्व सी असल्याने डोळ्यांची दृष्टी सुधारते.
पेरू रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. पेरूच्या पानांचा अर्क इंसुलिन आणि ब्लड शुगर नियंत्रणात ठेवतो. जेवल्यानंतर पेरूंच्या पानांचा चहा घेतल्याने साखर नियंत्रणात राहायला मदत होते. त्यामुळे मधुमेही रुग्णांनी पेरू खाणे अत्यंत फायदेशीर ठरते.
पेरूमध्ये असणारी अँण्टीऑक्सीडंट आणि जीवनसत्त्वे ह्रदयाचे फ्री रेडिकल्सपासून रक्षण करतात. पेरूमध्ये पोटॅशियम असते जे ह्रदयाच्या आरोग्याकरिताही आवश्यक आहे.. पेरूची पाने रक्तदाब कमी करतात आणि शरीरातील नको असलेले कोलेस्ट्रॉल कमी करून चांगले कोलेस्ट्रॉल वाढवतात. जेवणाआधी एक पिकलेला पेरू खाल्ला तर रक्तदाब 8-9 पॉईंटने कमी होतो.
वजन कमी करायचे असेल तर पेरू हे उत्तम फळ आहे. यामध्ये कॅलरीचे प्रमाण अत्यंत कमी असते. पेरू खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते. जीवनसत्त्व, मिनरल्स यांनी समृद्ध असलेले पेरू खाल्ल्याने शरीराला पोषक तत्त्वे मिळतात. रक्तातील साखरेचे प्रमाणही योग्य तेवढेच राहते. लठ्ठपणा कमी होतो.
बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांनी पेरू खावा. पेरूमधील बिया पोट साफ करण्यासाठी गुणकारी आहेत. जुनी बद्धकोष्ठतेची समस्याही पेरूमुळे दूर होते. पेरू फायबरचा एक उत्तम स्त्रोत आहे. एक पेरू खाल्ल्याने व्यक्तिला १२ टक्के फायबर मिळते तसेच पेरूची पाने डायरिया या आजारावर फायदेशीर आहेत.
पेरूमध्ये लायकोपीन, क्वेरसेटिन आणि पॉलीफेनोल्स कर्करोगाच्या पेशींना वाढण्यापासून थांबवते. पेरूच्या पानांमध्ये अँण्टीकॅन्सर गुणधर्म असतात. एका अभ्यासानुसार, पेरूच्या पानांचा अर्क कर्करोगाच्या पेशींना वाढवण्यापासून थांबवतो.