Copper Massage therapy : वेगवेगळ्या समस्या दूर करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने मालिश केली जाते. शरीराचा थकवा आणि वेदना दूर करण्यासाठी मालिश चांगला उपाय मानला जातो. मालिश केल्याने मांसपेशींना आराम मिळतो आणि रक्तप्रवाह सुद्धा सुरळीत होतो. पण तुम्ही कधी कांस्याच्या वाटीने पायांची मालिश करण्याबाबत काही ऐकलं का? नसेल ऐकलं तर आज आम्ही तुम्हाला याच्या फायद्याबाबत सांगणार आहोत.
कांस्याची मालिश
कांस्याची मालिश ही कांस्याच्या भांड्याद्वारे केली जाते. हा आयुर्वेदातील एक खास उपाय आहे. यात कांस्याच्या वाटीने तळपायांची मालिश केली केली जाते. कांस्य एक असा धातु आहे ज्यात अनेक औषधी गुण असतात. याने मालिश केल्याने मेंदू आणि शरीर दोन्हींना आराम मिळतो. कांस्याने चेहरा, पाठ आणि तळपायांची मालिश केली जाते. याच्या मदतीने मानसिक आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत मिळते.
कशी करावी ही मालिश?
कांस्याने मालिश करणं फारच सोपं आहे. यासाठी तुम्ही कांस्याची वाटी, लोटा किंवा कोणतंही भांड घ्या. मालिशसाठी तूप किंवा तेलाची गरज पडेल. तुम्ही खोबऱ्याचं तेल, तिळाचं तेल किंवा कोणत्याही हर्बल तेलाचा वापर करू शकता. आधी पाय स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर त्यावर तेल किंवा तूप लावा. नंतर कांस्याची वाटी तळपायांवर फिरवत फिरवत मालिश करा. याने पायांना आराम मिळेल. मालिश केल्यावर दोन तास पाय धुवू नका.
कांस्याने मालिश करण्याचे फायदे
कांस्याने जर तुम्ही तळपायांची मालिश केली तर याने तुमच्या गुडघे आणि टाचांना आराम मिळेल. त्याशिवाय शरीराला उष्णता मिळेल. कांस्याने मालिश केल्याने थकवा कमी होतो, पायांवरील सूज आणि वेदना दूर होते. डोळ्यांखाली असलेले काळे डाग दूर होतात. ज्या लोकांना झोप न येण्याची समस्या आहे, त्याना या मालिशने भरपूर फायदा मिळेल.