आजकालच्या चुकीच्या जीवनशैलीमुळे लोक कमी वयातच मधुमेह, रक्तदाब यांसारख्या आजारांना बळी पडत आहेत. दीर्घायुष्य निरोगी राहण्यासाठी चांगली जीवनशैली अवलंबण्याचा आणि आहारात आरोग्यदायी गोष्टींचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. हेल्थलाइनच्या माहितीनुसार, आहारात अक्रोडचा समावेश केल्यास अनेक आजारांपासून आपला बचाव होऊ शकतो. अक्रोडमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, चांगली चरबी आणि अँटी-ऑक्सिडंट असतात. अक्रोड तुमची त्वचा, हृदय, मेंदू, कोलेस्ट्रॉल इत्यादी उत्तम ठेवण्यास मदत करते. जाणून घेऊया अक्रोड खाण्याचे तुमच्या आरोग्यासाठी काय (Benefits of Walnuts) फायदे आहेत.
अक्रोडचे फायदे
टाईप 2 मधुमेह -अक्रोड खाल्ल्याने टाईप 2 मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते. यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते आणि जुनाट आजारांपासून आपला बचाव होतो.
रक्तदाब -संशोधनात असे आढळून आले आहे की, दररोज सुमारे 28 ग्रॅम अक्रोड खाल्ले तर त्यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि हृदय देखील निरोगी राहते.
मेंदूचे कार्य -नियमित अक्रोड खाल्ल्याने तुमचा मेंदूही चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. संशोधनात असे आढळून आले आहे की, त्यात असलेले चांगले फॅट, पॉलीफेनॉल आणि व्हिटॅमिन ई मेंदूचे नुकसान भरून काढण्यास मदत करतात. एवढेच नाही तर वाढत्या वयातही आपला मेंदू सक्रिय राहण्यासही मदत होते.
निरोगी वृद्धत्व -वाढत्या वयानुसार अनेक प्रकारच्या शारीरिक आणि मानसिक समस्या सुरू होतात. यासाठी आपण कमी वयापासून अक्रोड खायला सुरुवात केल्यास वृद्धापकाळातही आपण निरोगी आणि तंदुरुस्त राहू शकतो.
वजन नियंत्रण -दररोज अक्रोड खाल्यास आपले पोट दीर्घकाळ भरलेले जाणवते, भूक कमी लागते. अक्रोड खाल्याने शरीरात चरबीही वाढत नाही. त्यामुळे वजन नियंत्रित करण्यासाठी तुम्ही अक्रोड खाऊ शकता.
पचन -अक्रोड आतड्यांमध्ये असल्या चांगल्या बॅक्टेरियाचे पोषण करण्याचे काम करतात. त्यामुळे आपल्या पोटाच्या अनेक समस्या कमी होतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारते.