कोरोना व्हायरस दिवसेंदिवस अत्यंत घातक होत चालला आहे. आता कोरोनाचे इन्फेक्शन आपला आवाजही हिरावून घेऊ शकते, असा धक्कादायक खुलासा नुकत्याच आलेल्या एका अभ्यासात करण्यात आला आहे. कोरोना संक्रमण केवळ चव आणि गंधच नाही, तर आवाजही हिरावून घेऊ शखते, असे वैज्ञानिकांना आढळून आले आहे. Covid 19 मुळे व्होकल कॉर्ड पॅरालिसिसचा (Vocal Cord Paralysis) पहिला रुग्णही समोर आला आहे.
कोरोना आवाजासाठी किती घातक? -कोरोना संसर्गामुळे मज्जासंस्थेशी संबंधित अथवा न्यूरोपॅथिक समस्या देखील होऊ शकतात, असे अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स आय अँड इयर रुग्णालयातील संशोधकांना आढळून आले आहे. यामुळेच, व्होकल कॉर्ड अर्थात आवाज नलिकेत पॅरालिसिसचे प्रकरण आढळून आले आहे. जर्नल पीडियाट्रिक्समध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अभ्यासाच्या अहवालात कोरोनामुळे होणाऱ्या इतर गंभीर समस्यांसंदर्भातही अलर्ट करण्यात आले आहे.
कोरोनानं हिरावला मुलीचा आवाज -संबंधित रिपोर्टनुसार, सार्स-सीओव्ही-2 व्हायरस संसर्गाच्या काही दिवसांनंतर, एका 15 वर्षांच्या मुलीला अचानकपणे श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तिला रुग्णालयात दाखल केले असता, मज्जासंस्थेवरील कोरोनाच्या दुष्परिणामामुळे तिला व्होकल कॉर्ड पॅरालिसिस झाल्याचे निदर्शनास आहे. या मुलीला आधीपासूनच अस्थमा आणि एंक्झायटीची समस्याही होती. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार, एंडोस्कोपिक तपासणीत तिच्या व्हॉइस बॉक्समध्ये आढळून येणाऱ्या दोन्ही व्होकल कॉर्डमध्ये समस्या दिसून आली.
व्होकल कॉर्ड पॅरालिसिसचा पहिला रुग्ण -अभ्यासकर्त्यांनी म्हटले आहे की, कोविड-19 च्या सुरुवातीनंतर, या वयातील व्होकल कॉर्ड पॅरालिसिसचा हा पहिलाच रुग्ण आहे. खरे तर, वृद्धांमध्ये अशा प्रकारची समस्या यापूर्वी दिसून आली आहे. हार्वर्ड मेडिकल स्कूलमधील प्राध्यापक क्रिस्तोफर हार्टनिक यांचे म्हणणे आहे की, कोरोना संक्रमणामुळे डोकेदुखी, हार्ट अॅटॅक आणि पेरिफेरल न्यूरोपॅथी सारख्या विविध प्रकारच्या न्यूरोलॉजिकल समस्या दिसून येऊ शकतात. तसेच, कोरोना व्हायरसमुळे व्होकल कॉर्ड पॅरालिसिसचा धोकाही निर्माण होऊ शकतो, हे यावरून दिसून येते. यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वेळीच उपचार करायला हवेत.