पिंपरी : जिल्हा रुग्णालय किंवा स्त्री रुग्णालयात वर्षभरातील ओपीडींच्या संख्येवरून महिलांना सर्वाधिक धोका हा पीसीओडी, अंगावरून जाणे, पाळीच्या समस्यांचा सामना अधिक करावा लागताे, असे स्त्रीराेगतज्ज्ञांचे मत आहे. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येतात.
पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात औंध जिल्हा रुग्णालयात महिलांच्या आजारांवर उपचार करण्यासाठी स्वतंत्र स्त्रीराेग विभाग आहे. या विभागात दरराेज ८० ते १०० महिला उपचारासाठी येत असतात. या महिला शहरास उपनगर, ग्रामीण भागातूनही येतात. त्यापैकी बहुतांश महिला या गर्भधारणा, प्रसूती यांच्या असतात. परंतू, सध्याच्या जीवनशैलीमुळे महिलांमध्ये सर्वाधिक पाॅलिसिस्टिक ओव्हरी डिसिज म्हणजे ‘पीसीओडी’ चा त्रास अधिक दिसून येताे.
३० हजार महिलांवर जिल्हा रुग्णालयात उपचार
गेल्या वर्षभरात पुणे जिल्हा रुग्णालयातील बाहयरुग्ण विभागात सुमारे ३० हजार महिलांवर उपचार करण्यात आले. त्यामध्ये सर्वच प्रकारचे आजार असलेल्या महिला रुग्णांचा समावेश हाेता. विशेषकरून महिलांच्या पाळीविषयक समस्या अधिक दिसून आल्या.
महिलांना चिंता या आजारांची -
पीसीओडी : बदललेली जीवनशैली, खाणपान पध्दती यामुळे महिलांना पीसीओडी अर्थात पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोमचा त्रास हाेताे. हार्माेनचे संतुलन बिघडल्याने हा अंडाशयाचा आजार हाेताे. या आजारात अंडाशयाला अनेक गाठी येतात. यामध्ये मासिक पाळीतील अनियमितता, वजनामध्ये वाढ आदी समस्या वाढतात. बाहेरचे फास्ट फूड खाणे टाळा व घरचे जेवण करा, वेळेवर झाेपा, व्यायाम करा.
अंगावरून जाणे : महिलांना सतावत असलेल्या समस्यांपैकी अंगावरून पांढरे जाणे ही एक समस्या आहे. हादेखील जीवनशैलीचा आजार असून, बाहेरचे खाणे टाळणे, व्यायाम करणे गरजेचे आहे.
मुलींना लवकर पाळी येणे : मुलींना पूर्वी १४ ते १५ व्यावर्षी पाळी यायची. मात्र, टीव्ही, माेबाईलचा वाढता वापर, उपलब्ध इंटरनेट सुविधा यामुळे पाॅर्नसदृश कंटेटचा मारा मुलींवर हाेत असल्याने त्या लवकर वयात येत असल्याचेही निरीक्षण डाॅक्टर नाेंदवतात.
बाहयरुग्ण विभागात उपचारासाठी येणाऱ्या महिलांपैकी बहुतेक मुली किंवा स्त्रियांना पीसीओडी समस्या अधिक दिसून येते. त्यापाठाेपाठ अंगावरून जाणे, लहान मुलींना कमी वयात पाळी येत असल्याचे दिसून येते. त्याचबराेबर गर्भवती, प्रसूतीसाठी महिलांची संख्या जास्त आहे. महिलांच्या समस्या या बदलत्या जीवनशैलीमुळे वाढलेल्या आहेत. त्यासाठी फास्ट फूड टाळणे, व्यायाम करणे गरजेचे आहे.
- डाॅ. ऋता मुळे, विभागप्रमुख, स्त्रीराेग विभाग, जिल्हा रुग्णालय, औंध.