जंक फूड आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या परिणामांबाबत आपण अनेक गोष्टी ऐकत असतो. परंतु अनेकदा हे पदार्थ तयार करताना वापरण्यात येणाऱ्या पदार्थांची अॅलर्जी होऊ शकते. अशाच एका पदार्थाची अॅलर्जी झाल्यामुळे लंडनमधील या घटनेने तुम्हीही हैराण व्हाल. लंडनमध्ये राहणाऱ्या 18 वर्षांच्या ओवन कॅरीसोबत एक दुर्दैवी घटना घडली. कॅरी आपल्या बर्थडेच्या दिवशी एका ब्रिटिश बर्गर चेन बायरोनमध्ये जेवण्यासाठी गेले होते. पिपल.कॉमने दिलेल्या वृत्तानुसार, कॅरीने ऑर्डर करताना रेस्टॉरंटमध्ये सांगितलं होतं की, त्याला दूधापासून अॅलर्जी आहे. परंतु, तरिही रेस्टॉरंटने त्यांच्या म्हणण्याकडे फारसं लक्षं दिलं नाही.
यूके प्रेस असोसिएशनने दिलेल्या वृत्तानुसार, कॅरीच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, कॅरी आपला 18वा वाढदिवस साजरा करत होता. जेव्हा त्याने रेस्टॉरंटला सांगितले की, त्याला दूधाची अॅलर्जी आहे. तेव्हा रेस्टॉरंटने त्याला विश्वासात घेऊन तुम्ही ऑर्डर करत असलेले पदार्थ पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले होते.
ऑर्डर आल्यानंतर अर्धा ग्रिल्ड बर्गर खाल्ला आणि काही वेळातच कॅरीला अॅलर्जीची लक्षणं जाणवू लागली. कॅरीला अजिबात कल्पना नव्हती की, त्यामध्ये बटरमिल्कचा वापर करण्यात आला आहे. द गार्जियनने दिलेल्या वृत्तानुसार, कॅरी त्यावेळी आपल्या गर्लफ्रेंडसोबत रेस्टॉरंटमध्ये गेला होता. खाऊन झाल्यानंतर रेस्टॉरंटमधून बाहेर पडल्यावर त्याचा मृत्यू झाला. मेडिकल सहाय्यकांनी कॅरीला प्राथमिक उपचार केले परंतु 45 मिनिटांनी त्याचा मृत्यू झाला.
सीएनएनने दिलेल्या वृत्तानुसार, बालार्डने साउथवार्क कोर्टात सुरू असलेल्या खटल्यामध्ये असं सांगितलं की, मृत व्यक्तीने स्टाफला आपल्याला असलेल्या अॅलर्जीबाबत सांगितले होते. परंतु, मेन्यूमध्ये हे सुनिश्चित करण्यात आलं होतं की, त्यांनी निवडलेल्या पदार्थांमध्ये कोणताही अॅलर्जी असणारा घटक नाही.
कॅरीच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे की, 'आम्हाला ठाऊक आहे आमच्या मुलाने खाण्याआधी पूर्णपणे काळजी घेतली असेल. तसेच कुटुंबियांनी एक नवीन कायदा पारित करण्याची मागणी केली आहे. ज्यामुळे भविष्यात होणाऱ्या असा घटनांवर आळा बसण्यास मदत होईल. तसेच सर्व रेस्टॉरंटच्या मेन्यूमध्ये अॅलर्जी लेबलिंग करण्यात आलेलं असेल.