मुंबई : नाश्त्याला चहासोबत बिस्कीट आणि खारी अधिक प्रमाणात खाणाऱ्यांची भविष्यात साखरेची चिंता वाढू शकते, अशी भीती आहारतज्ज्ञांकडून व्यक्त केली जाते. त्यातच आता दिवाळीमध्ये मैद्याने तयार केलेले फराळाचे पदार्थ खाण्यावर नियंत्रण न ठेवल्यास त्याचा वाईट परिणाम शरीरातील इन्सुलिनची पातळी असंतुलित होण्यात होऊ शकतो. दिवसाची सुरुवात खारी, बिस्किटे यासारख्या पदार्थाने करताना त्यात आढळणाऱ्या मैद्याच्या रूपात कार्बोहायड्रेट, सॅच्युरेटेड फॅट्स जरी झटपट ऊर्जा देत असले, तरी दीर्घकाळापर्यंत शरीराला कार्यक्षमतेने टिकवून ठेवू शकत नाही. तेव्हा प्रथिनांच्या महत्त्वपूर्ण स्रोताचा समावेश केल्यास दीर्घ कालावधीसाठी परिपूर्णतेची भावना निर्माण होते.
मैद्याऐवजी ज्वारी, बाजरी !सणासुदीच्या काळात, विशेषत: दिवाळीमध्ये भरपूर मिठाई आणि चवदार पदार्थ आसपास असल्याने ते खाण्याचा मोह आवरणे कठीण आहे. मात्र, आरोग्यासाठी या मैद्याच्या पदार्थ व्यतिरिक्त ज्वारी, बाजरी, कंगी तसेच राजगिरा यासारख्या आरोग्यदायी पर्यायांपासून बनवलेल्या स्वादिष्ट पदार्थांचा पर्याय निवडू शकतो. ज्याने फराळाच्या पौष्टिकतेमध्ये लक्षणीय सुधारणा होऊ शकते.
तासाभरात खा नाश्तावेळेत न्याहारी घेतल्याने तुमचे चयापचय सुरू होण्यास मदत होत. आवश्यक ऊर्जा मिळते, तसे न जमल्यास निदान दोन तासांत नाश्ता करण्याची शिफारस केली जाते. ही वेळ शरीराला दिवसभर न्याहारीतून मिळणारे पोषक आणि ऊर्जा प्रभावीपणे वापरण्यास उपयुक्त ठरते.
नाश्त्याला काय खावे?चणा डाळ किंवा उडीद डाळ यासारख्या कडधान्यांसह रवा तसेच बाजरी यासारख्या स्रोतांमधून कार्बोहायड्रेटसह केवळ ऊर्जाच नाही, तर दिवसाची चांगली सुरुवात करण्यासाठी आवश्यक प्रथिनेही मिळतात, तसेच दिवसाची सुरुवात संपूर्ण प्रथिने, सुका मेवा आणि दुधाने केल्यासही फायदा होईल.
शरीरासाठी खाताय की मनासाठी?शारीरिक परिपूर्णतेपर्यंत खाणे आणि मानसिक समाधान होईपर्यंत खाणे यात फरक आहे. अधिक पौष्टिक धान्य आपल्या स्वयंपाकात समाविष्ट करत निरोगी भविष्यासाठी खाण्यावर योग्य ते नियंत्रण ठेवावे. मधुमेहासारख्या चयापचयाशी संबंधित विकारांचा फारसा परिणाम न होता पुढच्या अनेक दिवाळी आनंदाने साजरी करण्याचा मार्ग मोकळा होईल.- अदिती लोटनकर, आहारतज्ज्ञ