डॉ. अमीन अहेमद, सीएमओ
ऑक्सिजनचा कोरडेपणा कमी करण्यासाठी तो रुग्णास ह्यूमीडीफायर बाटलीतून दिला जातो. बाटलीवरच्या मॅक्झीमम खुणेच्या खाली १ सेंटीमीटरपर्यंत डिस्टील्ड पाणी भरावे, नळाचे किंवा मिनरल वॉटर नाही. पाणी दिवसातून दोनदा बदलावे. मिनिमम लाईनच्या खाली पाण्याची पातळी जाऊ देऊ नये. बाटली साबणाच्या पाण्याने, नंतर स्वच्छ पाण्याने धुवून कोरडी करून वापरावी किंवा ऑटोक्लेव्ह करावी. बाटली व जोडलेले ट्यूब कमीत - कमी आठवड्यातून एकदा अँटिसेप्टीक सोल्यूशनने स्वच्छ करावे. नवीन रुग्णासाठी बाटली व ट्युबिंग बदलावे.
डॉ. सुनील कसबेकर, नेत्ररोग तज्ज्ञ
म्युकरची लक्षणे लवकर लक्षात आली तर रुग्णाचा डोळा आणि जीव वाचू शकतो. जास्त काळ ऑक्सिजन मिळालेले / आयसीयुमध्ये राहिलेल्यांनी सुटी झाल्यानंतर डोळ्यावर सूज, दुखणे, तिरळेपणा, एकाचे दोन दिसणे, असे जाणवल्यास डॉक्टरांना ताबडतोब दाखवावे. नेमक्या प्रमाणात स्टीरॉईड्स, उच्च अँटिबायोटिक्स दिल्यास, ऑक्सिजनच्या उपकरणांची स्वच्छता, साखर नियंत्रणात ठेवल्यास बुरशीपासून बचाव होऊ शकतो.
सविता घोरपडे, अधिपरिचारिका, कोविड हॉस्पिटल
प्रत्येक नवीन रुग्णास निर्जंतुक केलेली ह्युमीडीफायर बॉटल, बायपॅप व इतर मास्क, ट्यूब वापराव्या. ऑक्सिजन मास्क ओला होऊ देऊ नये. प्रत्येक रुग्णाला सेवा देताना आरोग्य कर्मचाऱ्यांनी हात सॅनिटायझर / साबण पाण्याने स्वच्छ करावे, तसेच हातमोजे बदलावे. एका कर्मचाऱ्यास सर्व रुग्णांचे मास्क, ह्युमीडीफायर बाटल्यांची काळजी, पाणी बदलणे यासाठी नेमून द्यावे.
डॉ. मनोज बेलसरे, कान - नाक - घसातज्ज्ञ
गंभीर रुग्णांनी घरी गेल्यानंतर स्वच्छ कोरडा मास्क वापरावा. धूळ, बांधकामाच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे, कारण अशा ठिकाणी बुरशी असते व नाकातून प्रवेश करू शकते. काळी बुरशी नॉर्मल व्यक्तींमध्ये किंवा पेशंटपासून इतरांना पसरत नाही.रक्तातील साखर नियंत्रणात ठेवावी. रुग्णालयात स्टीरॉईड व अँटिबायोटिक्स आवश्यकतेप्रमाणेच द्यावेत. ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या उपकरणांची स्वच्छता राखावी. जर नाकात किंवा सायनसमध्ये बुरशीचा प्रादुर्भाव आढळला तर तो भाग ऑपरेशनद्वारे खरवडून स्वच्छ करावा लागतो.