कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत संसर्ग क्षमता जास्त असलेल्या डबल म्युटेशनमुळे रुग्णसंख्या प्रचंड वाढली. या लाटेत रुग्ण आणि मृतांची संख्याही वाढली. एका संशोधनानुसार, कोरोनाचा गंभीर संसर्ग झालेल्या ५० टक्के रुग्णांच्या हृदयाला इजा झाल्याचे आढळून आले आहे. कोरोना संसर्ग झालेल्या रुग्णांच्या शरीरात रक्ताच्या गाठी तयार होतात. याला वैद्यकीय भाषेत थ्रॉम्बॉसिस म्हणतात. हृदयाच्या स्नायूंना सूज येते. वैद्यकीय भाषेत याला मायोकार्डायटीस म्हटले जाते. कोरोना संसर्गात शरीरावर मोठा ताण पडतो. हे देखील कोरोनामुक्त झाल्यानंतर हार्ट अटॅक येण्याचे एक कारण आहे.
रक्ताची गाठ तयार होते म्हणजे काय?
कोरोना संसर्गात शरीरात रक्ताच्या गाठी तयार होण्याचे प्रमाण वाढते. हे प्रमाण कमी करण्यासाठी रुग्णांना रक्त पातळ करणारी इंजेक्शन द्यावी लागतात. मध्यम आणि तीव्र स्वरूपाचा संसर्ग झालेल्यांना रक्त पातळ करण्याची औषध दिली जातात. काही रुग्णांना डिस्चार्ज नंतर ही औषध घेण्याची सूचना दिली जाते.
कोरोनामुळे हृदयाच्या स्नायूंना येते सूज
कोरोना विषाणू थेट हृदयाच्या स्नायूंमध्ये प्रवेश करतो. ज्यामुळे हृदयाच्या स्नायूंना इजा होते. या विषाणूंमुळे हृदयाचे स्नायू कमकुवत होतात. हृदय योग्यरीत्या काम करीत नाही. फुफ्फुस, हात, पाय, मेंदू यांच्यात अचानक गाठ तयार होते. हृदयाच्या स्नायूंना इजा झाली किंवा सूज आल्यास हार्ट अटॅकची शक्यता असते.
हृदयाचे आजार असलेल्यांनी काय काळजी घ्यावी ?
- ज्यांना हृदयविकाराचा त्रास आहे. त्यांच्याकडे जास्त लक्ष दिले पाहिजे. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरू ठेवले पाहिजेत.
- लॉंग कोविडचा त्रास महिन्यांनंतरही होत असेल. तर, वेळीच डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्यावी.
- नियमित व्यायाम करून डॉक्टरांच्या सल्ल्यानेच आहार घ्यावा.