वेळीअवेळी खाणं, जागरणं, ताण-तणाव, टार्गेट्स, धावपळ, जंक फूड या विळख्यात अडकल्यानं आजच्या तरुणाईला आजारांनी जखडून टाकलंय. धडधाकट दिसणाऱ्या तरुणांनाही ब्लड प्रेशर, डायबिटीसच्या गोळ्या घ्याव्या लागताहेत. विचित्र लाइफस्टाइल हृदयाशी संबंधित आजारांनाही आमंत्रण देतेय. त्यामुळे लहान वयातही हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रकार वाढत आहेत. आरोग्याकडे आपण करत असलेलं दुर्लक्ष हे या आजारपणांचं कारण आहेच, पण आपला रक्तगटही हृदयविकारासाठी कारणीभूत ठरत असल्याचं एका अभ्यासातून समोर आलंय.
हृदयविकार आणि रक्तगट यांचा काही संबंध आहे का, यावर आंतरराष्ट्रीय स्तरावर एक संशोधन झालं. त्यातून कुठल्या रक्तगटाच्या व्यक्तींना हृदयविकाराचा धोका अधिक असतो आणि कुठल्या रक्तगटाच्या व्यक्तींना कमी असतो, याबाबतचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
आपला रक्तगट 'ओ' असेल तर आपण 'सेफ झोन'मध्ये आहात. या व्यक्तींमध्ये हृदयाशी संबंधित आजार कमी प्रमाणात आढळून येतात. याचा अर्थ, 'ओ' रक्तगटाच्या व्यक्तींनी बेफिकीर राहावं, हवं ते खावं-प्यावं असा निश्चितच नाही. पथ्यं न पाळल्यास त्यांनाही हे विकार होऊ शकतातच; पण ए, बी आणि एबी रक्तगटाच्या व्यक्तींना खूपच काळजी घेणं गरजेचं आहे. कारण, या व्यक्तींना हृदयविकार होण्याची शक्यता अधिक असते. संशोधनात, हृदयाशी संबंधित आजार किंवा हृदयविकाराचा झटका आलेल्या व्यक्तींमध्ये ए, बी आणि एबी रक्तगट असलेल्या व्यक्तींची संख्या जास्त आढळून आली. या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा धोका ९ टक्क्यांनी अधिक असतो. ए ब्लड ग्रूप असलेल्या व्यक्तींमध्ये कॉलेस्टेरॉल जास्त असतं आणि ते हृदयविकाराचं सगळ्यात मोठं कारण आहे.