- डॉ. अभिषेक काटकवारज्याप्रमाणे एखाद्या कारला धावण्यासाठी अत्युच्च प्रतीच्या इंधनाची आवश्यकता असते त्याप्रमाणे आपल्याला शरीराला सकस आहाराची गरज असते. आरोग्यवर्धक आणि सर्वोत्कृष्ट अन्न ज्यात योग्य प्रथिने आणि जीवनसत्त्वांचा समावेश आहे, अशा आहाराचे सेवन करणे आवश्यक आहे. आपल्या शरीर आणि बुद्धीचे आॅक्सिटेटिव्ह स्ट्रेसपासून संरक्षण करणे गरजेचे आहे. शुद्ध साखर आणि संरक्षकांचे अतिप्रमाणातील सेवन शरीराला हानिकारक आहे. आज चिंता आणि नैराश्याचे प्रमाण वाढत असल्याचे आपण पाहत आहोत. आपल्या आतड्याच्या आतील आवरणामध्ये सिरोटीन हे रसायन तयार होते. हे केवळ आपल्याला चयापचयास मदत करीत नाही, तर आपले विचार आणि भावना संतुलित ठेवण्यास, तसेच आपली झोप, मूड, भूक, वेदना ग्रहण क्षमता यास नियमित करण्यास मदत करते. लोक तणावात असताना खाण्याकडे का वळतात, यावर अनेक वेळा चिंतन करण्यात आले आहे. आपण जेव्हा दु:खी असतो तेव्हा आपल्याला जास्त आवडणाऱ्या आहाराकडे आपण वळतो.सिरोटीनमुळे तात्पुरता आनंद मिळतो आणि त्यामुळेच असंख्य लोक अन्नाकडे वळतात व त्यांना आलेल्या तणावापासून काही क्षणासाठी सुटका झाल्यासारखी वाटते. बरेच लोक अन्न सहज उपलब्ध असल्याने तणावमुक्तीसाठी जेवण करण्यावर भर देतात. मात्र, यामुळे अॅनोरेक्झियासारखी समस्या उद्भवू शकते. आपण ग्रहण करीत असलेल्या आहाराकडे आपण किती प्रमाणात आकर्षित आहोत यावर खूप विचार करणे आवश्यक आहे. आपण जे अन्न खातो ते केवळ जिभेचे चोचले पुरविण्यासाठी खातो की, गरज म्हणून हे ठरविणे महत्त्वाचे आहे. तथापि, शरीराला पोषक नसणाºया अन्नाकडे आकर्षित होणे आणि त्याचे नेहमी सेवन करणे हे आपली बुद्धी, मन, अस्मिता यांच्यासाठी अतिशय हानिकारक आहे.आरोग्यासाठी घातक असलेल्या अन्नाचे सेवन करणे म्हणजे थकवा, चिडचिडेपणा, चिंता, नैराश्य आणि तणाव यांसारख्या विकारांना स्नेहपूर्वक आमंत्रित करणे हे आहे. याउलट प्रथिने, जीवनसत्त्वे, कार्बोहायड्रेट, तसेच भाजीपाल्यासारखा संतुलित आरोग्यदायी आहार आपल्याला ताजेतवाणे तसेच निरोगी ठेवतो आणि शाश्वत निरोगी तथा आनंददायी जीवन जगणे सुकर करते.
शरीराला सकस आहाराची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2019 2:49 AM