पैसे कमवणं जितकं जरूरी आहे तितकंच तुमचं आरोग्य चांगलं राखणं हेही आवश्यक आहे. भारतात तर आरोग्याला संपत्तीच म्हटलं जातं. योग्य मार्गाने पैसे कमवणाऱ्या व्यक्तीला समाधान लाभतं तसं आरोग्य संपत्ती कमवण्यासाठीही योग्य प्रयत्न करावे लागतात. कोरोना महामारीनंतर मागील दोन-अडीच वर्षांत लहान मुलांपासून मोठ्या व्यक्तींपर्यंत सर्वचजणांना आरोग्याच्या समस्यांचा सामना करावा लागत आहे. सतत आजारी पडत असल्यास वैद्यकीय सल्ला घेणं गरजेचं आहे; पण आहार (Diet) आणि रोगप्रतिकारक शक्ती (Immunity Power) वाढवण्यासाठी विविध उपाय करणंही तितकंच महत्त्वाचं आहे. विशेषत: 2 ते 3 वर्षे वयोगटातील मुलं वारंवार आजारी होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यांचं वजनही घटत असल्यानं पालकांना याची चिंता सतावत आहे. पण घरात छोटे-छोटे उपाय करून मुलांना निरोगी आयुष्य आपण देऊ शकतो. ‘न्यूज नेशन हिंदी’ने या संदर्भात वृत्त दिलं आहे.
जन्मानंतर जी मुलं पहिल्यांदा घराबाहेर पडली आहेत ती इतर मुलांच्या तुलनेत लवकर आजारी पडत असल्याची पालकांची तक्रार आहे. काही मुलांचं वजनही घटत आहे. या सर्व समस्येचं निराकारण करण्यासाठी महत्त्वाचे उपाय करता येतील. याचा फायदाही लवकर दिसून येईल. मुलांना आजारांपासून दूर ठेवण्यासाठी त्यांच्यातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यावर भर देणं आवश्यक आहे. मुलांचं वजन कमी होत असेल तर मुलांना वजन वाढवणारा आहार द्यायला हवा. यात प्रामुख्याने त्या-त्या हंगामातील फळं (Seasonal Fruits), भाजीपाला, अंडी (Eggs), दूध, पनीर असा आहार देऊन मुलांमधील रोगप्रतिकारक शक्ती वाढवता येते. दैनंदिन जीवनात या आहाराची सवय लावल्यास सतत होणाऱ्या आजारांवर सहज मात करता येणं शक्य आहे.
जंक फूड टाळणं कधीही चांगलं-आजघडीला मुलांना जंक फूड (Junk Food) खाण्याची अधिक सवय लागलेली आहे. सजग पालक म्हणून आपण त्यांच्या आहारातील जंक फूड बंद करणं आवश्यक आहे. त्याऐवजी घरी केलेले जाणारे पोळी, विविध प्रकारच्या डाळी, अंडी, दही आदींचा त्यांच्या आहारात समावेश करायला हवा. मुलं टाळाटाळ करत असतील तरी दिवसांतून दोन वेळा त्यांना दूध द्यायला हवं. यातून त्यांचं आरोग्य चांगलं राहतं.
वारंवार सर्दी होत असल्यास इंजेक्शन द्यावं-वातावरण बदललं की बहुतांश जणांना सर्दी-पडसं होतं. मुलांमध्येही अशी समस्या पाहायला मिळते. त्यामुळे आवश्यकतेप्रमाणे वैद्यकीय सल्ल्याने मुलांना ‘फ्लू’चं इंजेक्शन द्यायला हवं. यामुळे मुलं वारंवार आजारी पडणार नाहीत.
मुलांची चिडचिड वाढल्यास त्यांना जंतांचे औषध देणं उत्तम-अनेकदा मुलांच्या पोटात जंत वाढल्याने मुले अधिक चिडचिड करतात. शिवाय आजारीही पडत असतात. त्यांचं वजनही घटत असतं. अशा वेळी वैद्यकीय सल्ल्याने दर सहा महिन्यांनी त्यांना जंतांचं औषध द्यायला हवं. दरम्यान, मुलांच्या निरोगी आयुष्यासाठी कुटुंबातील आहाराच्या सवयीही तितक्यात महत्त्वाच्या ठरतात. पालकांनी जंक फूडऐवजी घरात तयार केलेला साधा, सात्त्विक आहार घेतल्यास मुलांनाही त्याची सवय होते व आजारी पडण्याचं प्रमाणही आपोआप कमी होतं.