मेंदूचे स्कॅन सांगणार तुमच्या ‘वेट लॉस’चे भविष्य
By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2016 5:39 PM
‘वेक फॉरेस्ट बाप्टिस्ट मेडिकल सेंटर’च्या शास्त्रज्ञांनी मेंदूचे स्कॅन करून वजन घटविण्यात कोण यशस्वी ठरेल हे सांगणारी जलद स्कॅनिंग पद्धत शोधून काढली आहे.
वजन घटवण्यासाठी आपण काय काय नाही करत? सर्व उपाय आणि पथ्ये पाळूनही मनासारखा परिणाम दिसून येत नाही. यावर उपाय म्हणून संशोधकांच्या गटाने मेंदू स्कॅन करण्याची एक अशी आधुनिक पद्धत विकसित केली आहे जी वृद्ध व्यक्तीमध्ये वजन कमी होण्याची किती शक्यता आहे याबद्दल अंदाज वर्तवू शकते.‘वेक फॉरेस्ट बाप्टिस्ट मेडिकल सेंटर’च्या शास्त्रज्ञांनी मेंदूचे स्कॅन करून वजन घटविण्यात कोण यशस्वी ठरेल हे सांगणारी जलद स्कॅनिंग पद्धत शोधून काढली आहे.स्ट्रक्चरल ब्रेन कॅरेक्टरिस्टक्सचा वापर करून अशा प्रकारच्या स्कॅनिंगद्वारे एखादी व्यक्ती वजन कमी करण्यात किती यशस्वी ठरेल याचा अंदाज बांधला जाऊ शकतो. या माहितीवरून मग आपण त्या व्यक्तीसाठी वैयक्तिक उपचार प्रणाली तयार करू शकतो, अशी माहिती प्रा. जॉनथन बर्डेट यांनी दिली.उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्ती वजन कमी करण्यात अयशस्वी होणार असेल तर त्यासाठी स्पेशल काळजी घेतली जाऊ शकते. या अध्ययनात ६० ते ७९ वयोगटातील ५२ लोकांनी सहभाग घेतला होता. त्यांचा बीएमआय २८ ते ४२ दरम्यान होता तर त्यांना हृदयविकार आणि मेटाबोलिक सिन्ड्रोमचाही त्रास होता. सहभागी झालेल्या लोकांचा बेसलाईन एमआरआय स्कॅन केला गेला आणि मग ‘डाएट’, ‘डाएट व अॅरोबिक व्यायाम’ आणि ‘डाएट व रिझिस्टन्स एक्ससाईज प्रशिक्षण’ अशा तीन गटांत विभागण्यात आले. सुमारे दीड वर्षांच्या या डाएट व व्यायाम प्रकल्पाचा उद्देश ७ ते १० टक्के बॉडी मास कमी करण्याचा होता.दीड वर्षांनी त्यांचे पुन्हा एमआरआय स्कॅन करून त्याची आधीच्या स्कॅनिंगशी तुलना करण्यात आली. मेंदूच्या ग्रे आणि पांढरे मॅटरवरून मग वजन कमी करण्यात किती प्रमाणात यश मिळेल याचा अंदाज वर्तवला जातो.