लंडन : कोरोना व्हायरसमुळे लोकांमध्ये पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक देशांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याने काही ठिकाणी भीषण परिस्थिती आहे. कोरोनाचा सामना करण्यासाठी अनेक देशात लसीकरण मोहिमेवर जोर देण्यात येत आहे. दरम्यान, ब्रिटनमध्ये आता 6 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांनाही लस दिली जाणार आहे.
ब्रिटनने मुलांना कोरोना व्हायरसपासून वाचवण्यासाठी मॉडर्ना इंका (Moderna Inca) ने विकसित 'स्पाइकवॅक्स' (Spikevax) लसीला मंजुरी दिली आहे. 6 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांना ही लस देण्यात येणार आहे. ब्रिटनच्या औषध नियामक मेडिसिन अँड हेल्थकेअर प्रॉडक्ट्स रेग्युलेटरी एजन्सीनुसार (MHRA) मॉडर्नाच्या स्पाइकवॅक्स लसीने सुरक्षा, गुणवत्ता आणि परिणामकारकता या निकषांची पूर्तता केली आहे.
ब्रिटनमध्ये 12 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी स्पाइकवॅक्स आधीच मंजूर करण्यात आली होती. यानंतर लहान मुलांना ही लस देण्यास मान्यता देण्यात आली. याच्या काही तासांपूर्वी व्हॅल्नेव्हा या फ्रेंच फर्मची लस वयस्कर लोकांसाठी मंजूर करण्यात आली होती. व्हॅल्नेव्हाची लस ही सहज साठवून ठेवता येणारी कोरोना प्रतिबंधक लस आहे.
मॉडर्नाने तयार केलेल्या स्पाइकवॅक्स लसीला ब्रिटनमधील 6 ते 11 वर्षे वयोगटातील मुलांसाठी मंजुरी देण्यात आली आहे, हे सांगण्यास आनंद होत आहे. ही लस या वयोगटातील मुलांसाठी सुरक्षित आणि प्रभावी आहे, असे असे एमएचआरएचे प्रमुख म्हणाले. तसेच, स्पुटनिकच्या रिपोर्टनुसार, ब्रिटनने आतापर्यंत सहा अँटी-कोरोना लसींना मंजुरी दिली आहे. यामध्ये BioNTech/Pfizer, Johnson & Johnson, Moderna, Novavax, AstraZeneca आणि Valneva यांच्या लसींचा समावेश आहे.
दरम्यान, ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये पुन्हा वाढ होत आहे. गेल्या महिन्यात प्रत्येक 16 पैकी एक जण संक्रमित आढळला होता. हा संसर्ग दर फेब्रुवारीमध्ये नोंदवलेल्या दरापेक्षा दुप्पट आहे. फेब्रुवारीमध्ये, चाचणी करण्यात आलेल्या प्रत्येक 35 लोकांमध्ये एक कोरोना संक्रमित आढळला होता.