- सारिका पूरकर-गुजराथी
भारत ही येत्या काळात मधुमेहाची राजधानी बनते की काय असं वाटावं इतकं मधुमेही रूग्णांच प्रमाण भारतात आहे. लठ्ठपणाची समस्याही मोठ्या प्रमाणात आढळून येते आहे. पंचविशी-तिशीतील तरुणांचा मृत्यू हृदयाविकारानं होताना दिसतोय. बदलती जीवनशैली आपल्या मुळावर उठलीय की काय? असा प्रश्न पडावा असं वातावरण सध्या आजूबाजूला आहे. बदलत्या जीवनशैलीतला महत्त्वाचा घटक म्हणजे बैठं काम. दिवसातले १२ ते १४ तास एका जागेवर बसून बहुतांश नोकरदार आणि व्यावसायिक काम करत असतात. याबाबतीत आरोग्य तज्ज्ञांचं म्हणणं आहे की धूम्रपानाइतकाच धोका या ‘बैठक’ संस्कृतीमुळे निर्माण होऊ पाहतोय. साहजिकच याचेच विपरित परिणाम दिसू लागलेय.
पचनसंस्थेचं काम बिघडणं, हायपर अॅसिडिटी, संधीवात ही दुखणी देखील कमी वयातच मानगुटीवर बसू लागली आहेत. युवाशक्ती ही कोणत्याही राष्ट्राची सर्वात मोठी संपत्ती असते आणि तिच जर अशी अकाली आणि गंभीर आजारांच्या विळख्यात सापडत असेल तर हे असं नुसतंच पाहात बसायचं का? यावर काहीतरी मार्ग काढायलाच हवा. सकाळी लवकर उठून व्यायाम करणं शक्य होत नाही. १४ ते १६ तास काम केल्यानंतर रात्री शतपावलीही करायलाही ऊर्जा शिल्लक राहात नाही.
आॅफिस, घर-संसार या जबाबदाऱ्यांमधून व्यायामाला मात्र नेहमीच बगल दिली जातेय. मग काय करणार?असा प्रश्न आपल्याला पडतोय. आपल्यालाच काय तर जगभरातल्या अनेकांची व्यायामाला वेळच नाही अशी तक्रार असते. अशा तक्रारीवर जपाननं मात्र एकदम सही उत्तर शोधून काढलय. जपानमधील काही कंपन्यांनीच त्यांच्या एम्प्लॉईजच्या आरोग्यासाठी पुढाकार घेत आॅफिसमध्ये जसा लंच ब्रेक असतो तसा आता सर्वांना ‘एक्झरसाईज ब्रेक ’ म्हणजे व्यायामाची सुटी अनिवार्य केली आहे.
लंच झाल्यावर सर्व कर्मचाऱ्यांसाठी या कंपन्यांमध्ये वर्कआऊट सेशन असतं. दररोज दुपारी १ वाजता होणाऱ्या या व्यायाम सुटीत केलेल्या वर्र्कआऊटमुळे जेवणानंतर जी सुस्ती, आळस येतो तो देखील दूर होतो तसेच व्यायामही होतो. कधीकधी सकाळी देखील हा ब्रेक घेतला जातो. या व्यायामाचे प्रकारही सोपे आहेत. स्ट्रेचिंंग, बेण्डिंग म्हणजे अवयवांना ताणणं, वाकवणं अशा स्वरुपाच्या सोप्या हालचाली या सेशनमध्ये केल्या जातात.
या एक्झरसाईज ब्रेकनं जपानमध्ये चांगलीच लोकप्रियता कमावली असून तब्बल २८ दशलक्ष कर्मचारी रोज या ब्रेकमध्ये व्यायाम करायला लागले आहेत. दरम्यान केवळ कॉर्पोरेट आॅफिसमध्ये जिम, जिम इक्विपमेंट्स असणं म्हणजे कोणी फिट अॅण्ड फाईन राहत नाही तर त्यासाठी कर्मचाऱ्यांची शारीरिक तंदुरुस्ती टिकवणं, वाढवणं हे खरं तर कॉर्पोरेट धोरण आहे असे फ्रिजिकुरा कंपनीचे आरोग्य व्यवस्थापक केनिचिरो असानो यांनी म्हटलय.
काही वर्षांपूर्वी होंडा या प्रसिद्ध दूचाकी निर्मिती कंपनीनंही हा प्रयोग त्यांच्या फॅक्टरी, आॅफिसमध्ये केला होता. त्याचे खूप सकारात्मक परिणाम त्यांना पाहायला मिळाले होते. एकतर त्यांचे कर्मचारी अधिक जोमानं म्हणजे उत्साह, एनर्जीनं काम करायला लागले होते. कर्मचारी आजारी पडणं, आजारपणासाठी सुटी घेणं याचं प्रमाणही आश्चर्यकारक कमी झालं होतं. कामाच्या ठिकाणी होणारे छोटे अपघातही कमी झाले होते. मुख्य म्हणजे कर्मचाऱ्यांमध्ये सोशल स्किल्स खूप विकसित झाल्या होत्या.
एवढे सारे सकारात्मक परिणाम काही वेळाच्या व्यायामाच्या सुटीमुळे पाहायला मिळाले होते. जपानमध्ये लंच, एक्झरसाईज ब्रेकनंतर आणखी एक ब्रेक काही कंपन्यांमध्ये दिला जातो. तो म्हणजे झोपेसाठीचा ब्रेक. होय, आश्चर्य वाटले ना? आपल्याकडे कामाच्या ठिकाणी जरा चुकून डोळा लागला की लगेच कामचुकार असा शिक्का मारला जातो. पण जपानमध्ये वेगळा दृष्टिकोन बाळगून झोपेसाठी ब्रेक दिला जातो.
२०१४ मध्ये जपानमध्ये झालेल्या एका सर्वेक्षणात असं निरीक्षण नोंदवलं गेलं की जपानमधील कामगार हे केवळ ६ तास २२ मिनिटंच झोपतात. अन्य देशांमधील कामगारांपेक्षा जपानमधील कामगारांच्या झोपेचे तास हे खूपच कमी होते. आणि म्हणूनच चांगल्या आरोग्यासाठी पुरेशा झोपेचं महत्व जाणूनच जपानमध्ये आता कामाच्या ठिकाणी स्लिपिंग ब्रेकही दिला जातो. काम आणि व्यायाम हे दोन्ही एकाच ठिकाणी होऊ शकतं हे जपाननं दाखवून दिलं आहे.