डॉ. बेनी जोस, कन्सल्टंट – इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट ज्युपिटर हॉस्पिटल, पुणे
आरोग्य तपासणी करून घेणे ही आता अगदी सामान्य बाब झाली आहे. जेव्हापासून महामारीमुळे घराबाहेर चालणारे मैदानी आणि करमणुकीचे उपक्रम व्हायचे बंद झाले आहेत, तेव्हापासून लोक आपल्या आरोग्याविषयी अधिकाधिक जागरूक होऊ लागले आहेत. त्यामुळे, स्वाभाविकपणे अनेक लोक, विशेषतः मध्यमवयीन स्त्री-पुरुष आपल्या आरोग्याची स्थिती जाणून घेण्यासाठी संपूर्ण शरीराची तपासणी करून घेणे पसंत करत आहेत.
कार्डियाक हेल्थ पॅकेजमध्ये सर्वसाधारणपणे ECG, 2D-एकोकार्डिओग्राफी आणि ट्रेडमिल टेस्ट (TMT), ज्याला स्ट्रेस टेस्ट देखील म्हणतात, यांचा समावेश असतो. ECG आणि एको या चाचण्या मुळात हृदयाची स्थिती कशी आहे हे जाणून घेण्यासाठी केल्या जातात. ECG प्रामुख्याने हृदयाच्या स्नायूंच्या इलेक्ट्रिकल गुणधर्मांची स्थिती सांगते आणि आधी कधी तरी येऊन गेलेल्या हृदयविकारच्या झटक्यामुळे हृदयाच्या स्नायूला झालेल्या नुकसानाबाबत अधिक माहिती देते; तर एको चाचणी हृदयाच्या स्नायूचे संरचनात्मक आणि कार्यात्मक आरोग्य तपासण्यासाठी केली जाते. एकंदरित, या दोन्ही चाचण्या हृदयाची मुतभूत स्थिती कशी आहे, हे जाणून घेण्यासाठी केल्या जातात.
स्टेस टेस्ट मात्र, हृदयावर महत्तम ताण दिल्यानंतर हृदयाला होत असलेल्या रक्त पुरवठ्याची क्षमता तपासण्यासाठी केली जाते. प्रत्येक व्यक्तीची महत्तम तणावाची मर्यादा त्याच्या वयावर अवलंबून असते आणि प्रत्येक माणसाची मर्यादा उल्लंघली जाणार नाही, अशाप्रकारे ही चाचणी डिझाइन केलेली असते. जर स्ट्रेस टेस्ट दरम्यान ECG बदल दिसून आले, तर ही टेस्ट सामान्य नसल्याचे समजले जाते. या चाचणीत काही प्रमाणात खोटे पॉझिटिव्ह येण्याची शक्यताही असते. त्यामुळे, त्या रुग्णाचे एकंदर रिस्क फॅक्टर प्रोफाइल पाहून, स्ट्रेस टेस्टच्या पॉझिटिव्ह रिपोर्टची पुष्टी करण्यासाठी डॉक्टर कोरोनरी एंजियोग्राफी करण्याचा सल्ला देऊ शकतात.
रक्तवाहिन्यांमध्ये काही लक्षणीय अडथळे (ब्लॉकेज) असल्यास ते शोधून काढणे हा स्ट्रेस टेस्टचा प्रमुख उद्देश असतो. परंतु, हे अडथळे सामान्यपणे दोन प्रकारचे असतात. एक म्हणजे स्टेबल कोलेस्टेरॉल-रिच ब्लॉकेज, जे वर्षांनुवर्षांनंतर विकसित होतात आणि हळूहळू छातीवर दडपण येणे, धाप लागणे आणि स्टॅमिना कमी होणे अशी लक्षणे दिसू लागतात. दुसरा प्रकार म्हणजे, रक्ताच्या गुठळीमुळे उद्भवणारे अचानक, संपूर्ण ब्लॉकेज, ज्यांच्यामुळे ब्लॉक झालेल्या रक्तवाहिनीच्या आकारमानानुसार वेगवेगळ्या गांभीर्य स्तराचा हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. यापैकी पहिला प्रकार आहे, त्याचा माग घेण्यासाठीच फक्त स्ट्रेस टेस्टची मदत होऊ शकते कारण दुसरा प्रकार असा आहे, जो स्ट्रेस टेस्ट सामान्य (नॉर्मल) येत असणार्या रुग्णांमध्येही उद्भवू शकतो.
म्हणून, स्ट्रेस टेस्ट हे ब्लॉकेज असल्यास ते आधीच शोधण्याचे एक महत्त्वाचे साधन असले, तरी त्याचे अर्थघटन काळजीपूर्वक केले गेले पाहिजे. आणि चाचणीचे परिणाम काहीही असले, तरी आरोग्यप्रद जीवनशैली अंगिकारण्याची गरज देखील यावरून अधोरेखित होते.