गोड खायला अनेकांना आवडतं. फळं, भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ यासारख्या नैसर्गिक स्रोतांमधून मिळणारी शुगर सेफ आहे. पण जास्त साखर खाल्ल्याने आरोग्याला हानी पोहोचते. जास्त साखरेचं सेवन केल्याने मधुमेहाचा धोका तर वाढतोच, पण त्यामुळे हाय ब्लड प्रेशर, सूज येणं, वजन वाढणं आणि फॅटी लिव्हर यांसारख्या समस्याही उद्भवू शकतात. त्यामुळे साखरेचे सेवन मर्यादित असणं आवश्यक आहे जेणेकरून तुमचं आरोग्य चांगलं राहिल आणि तुम्ही या आजारांपासून दूर राहू शकता.
साखर आणि लिव्हरमधील संबंध
जास्त साखर खाल्ल्याने तुम्ही फॅटी लिव्हरच्या आजाराला बळी पडू शकता. याचा अर्थ लिव्हरमध्ये जास्त फॅट जमा होतं, ज्यामुळे लिव्हरच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतो आणि लिव्हर कॅन्सरचा धोका असू शकतो.
साखरयुक्त पेयांचा परिणाम
जामा नेटवर्कमध्ये प्रकाशित केलेल्या रिसर्चमध्ये असं आढळून आलं आहे की, जे लोक दररोज एक किंवा अधिक प्रमाणात साखर असलेलं पेय पितात त्यांना लिव्हर कॅन्सर होण्याचा धोका ८५% आणि लिव्हरच्या आजाराने मृत्यू होण्याचा धोका ६८% जास्त असतो. त्याच वेळी, जे लोक दर महिन्याला कमी साखरयुक्त पेय पितात त्यांना कमी धोका असतो.
साखरेचं योग्य प्रमाणात करा सेवन
साखर पूर्णपणे वाईट नसते, पण तिचं योग्य प्रमाणात सेवन करणं महत्त्वाचं आहे. तज्ञांच्या मते, महिलांनी २५ ग्रॅमपेक्षा जास्त साखर खाऊ नये आणि पुरुषांनी दररोज ३७.५ ग्रॅमपेक्षा जास्त साखर खाऊ नये. यामुळे तुमचं लिव्हर आणि एकूणच आरोग्य चांगलं राहील.
'या' गोष्टी ठेवा लक्षात
लेबल वाचा - जेव्हा तुम्ही पेय किंवा खाद्यपदार्थ खरेदी करता तेव्हा त्यांच्या पॅकेटवरील लेबल वाचा. यामुळे तुम्हाला कळेल की, त्यात किती साखर आहे, जर एखाद्या गोष्टीत जास्त साखर असेल तर ते कमी प्रमाणात खाण्याचा प्रयत्न करा.
संतुलन राखा - संतुलित प्रमाणात साखरेचं सेवन करा. याचा अर्थ जास्त साखर आणि मिठाई टाळा. थोडीशी साखर खाल्ली तर ठीक आहे, पण जास्त खाल्ल्याने आरोग्याला हानी पोहोचते.
निरोगी जीवनशैली - निरोगी राहण्यासाठी दररोज व्यायाम करा. यामुळे तुमचे शरीर तंदुरुस्त आणि निरोगी राहील. तसेच, संतुलित आणि पोषणयुक्त आहार घ्या. फळं, भाज्या, धान्य आणि प्रोटीनयुक्त पदार्थ तुमच्या आरोग्यासाठी चांगले असतात. यामुळे तुमचं लिव्हर आणि संपूर्ण शरीर निरोगी राहतं.