मासिक पाळी (Periods) ही एक नैसर्गिक प्रकिया आहे. सर्वसामान्यपणे वयाच्या 10 ते 15 व्या वर्षी मुलींना मासिक पाळी येते. मासिक पाळीदरम्यान होणारा त्रास महिलांसाठी एक गंभीर समस्या आहे. मासिक पाळीत प्रत्येक महिलेला प्रचंड वेदना होततात. त्यामुळे कामात लक्ष लागत नाही, सतत चिडचिड होते. अशातच मासिक पाळीत काही पदार्थ खाऊ नयेत, असा सल्लाही दिला जातो, त्यापैकी एक म्हणजे दही.
घरातील अनुभवी महिला सांगतात की पाळीत दह्याचं (Curd) सेवन केल्यानं ब्लड फ्लो वाढतो. याशिवाय इतरही समस्या उद्भवतात. पण खरंच असं असतं का? या विषयावरील अधिक माहिती घेण्यासाठी herzindagi.com ने ‘फॅट टू स्लिम’ ग्रुपच्या सेलिब्रिटी इंटरनॅशनल डायटिशियन आणि न्यूट्रिशनिस्ट शिखा अग्रवाल शर्मा यांच्याशी चर्चा केली. मासिक पाळी दरम्यान दह्याचं सेवन केलं जाऊ शकतं. त्यामुळे दही न खाण्यास सांगणं यात कोणतंही तथ्य नाही, असं त्यांनी सांगितलं.
एक्सपर्ट काय सांगतात?मासिक पाळीच्या काळात आपण खाण्यापिण्याची काळजी घेतली पाहिजे. या दिवसांत आरोग्यदायी पदार्थांचं सेवन केलं पाहिजे. मासिक पाळीत दही खाण्यात कोणतीही अडचण नाही. दही न खाण्याचा सल्ला हे केवळ एक मिथ्य आहे. दह्यामध्ये कॅल्शियम (Calcium) आणि प्रोटीन (Protein) असतं जे आरोग्यासाठी खूप चांगलं मानलं जातं. शिवाय दह्यामध्ये असलेले चांगले बॅक्टेरिया पचनक्रिया सुधारण्यास आणि पोट फुगण्यासंबंधित अडचणी कमी करण्यासाठी मदत करतात.
मग या दिवसांत काय खाऊ नये? मासिक पाळीत आहाराची विशेष काळजी घ्यावी. या दिवसात मसालेदार पदार्थ खाणं टाळावं. तसंच कॉफी आणि चहाचं सेवन करू नये. मासिक पाळीच्या काळात खारट पदार्थही खाऊ नयेत. जास्त प्रमाणात फॅटी फूड खाल्ल्याने मूड स्विंग (Mood Swings) आणि क्रॅम्प्सच्या समस्या उद्भवू शकतात. तसंच पाळीत दारूचं सेवनही करू नये. दुग्धजन्य पदार्थ आरोग्यासाठी खूप चांगले मानले जातात. पण दूध, मलई आणि चीज यांसारखे दुग्धजन्य पदार्थ पीरियड्सच्या काळात खाऊ नयेत. यामध्ये असलेले अॅराकिडोनिक अॅसिड मासिक पाळीच्या वेदना वाढवू शकतं.
दही कधी खाऊ नये -दह्याचा गुणधर्म थंड असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी दही खाणं टाळावं. मासिक पाळी असो वा नसो, रात्री दही खाऊ नये. दही खाल्ल्याने कफाची समस्या वाढते. दही फक्त दिवसा खावं आणि ताजं दही खावं, जास्त दिवसांचं आंबट दही खाऊ नये, ते आरोग्यासाठी चांगलं नसतं.
दही खाण्याचे फायदे -दह्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण मुबलक असतं. कॅल्शियम हाडांसाठी फायदेशीर आहे. दह्यामध्ये आढळणारे चांगले बॅक्टेरिया पचनाच्या समस्या कमी करण्यास मदत करतात. मासिक पाळीदरम्यान ताजं दही खाल्ल्याने स्नायू दुखण्यापासून आराम मिळतो. पाळीत तुम्ही ताक, लस्सी आणि स्मूदीच्या रूपात दही खाऊ शकता. यामुळे शरीर हायड्रेट राहील. त्यामुळे महिलांनी नियमितपणे दूध, दही ताक यांचं सेवन करणं गरजेचं असून, मासिक पाळीच्या काळात दही, ताक, लस्सी, स्मूदी यांचं सेवन करणं लाभदायी ठरतं, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.