वॉशिंग्टन : कर्करोग आणि हृदयविकाराच्या रुग्णांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. या आजारांवर लवकरच लस बनवता येईल, असा दावा अमेरिकन तज्ज्ञांनी केला आहे. या दशकाच्या अखेरीस जगभरातील कर्करोग आणि हृदयविकाराचे रुग्ण आता लसीद्वारे बरे होऊ शकतील. दरम्यान, कोरोना व्हायरस महामारीमध्ये लस संशोधनामुळे शास्त्रज्ञांना कर्करोग आणि हृदयविकाराच्या रुग्णांसाठी लस शोधणे सोपे झाले आहे.
आता लोक लवकरच कर्करोग, हृदय, रक्तवाहिन्या व स्वयंप्रतिकारसंबंधी आजार आणि इतर परिस्थिती टाळण्यासाठी लस घेण्यास सक्षम असतील, असे एका फार्मास्युटिकल फर्मने सुचवले आहे.'द गार्डियन'च्या वृत्तानुसार, कोरोना लसीनंतर आता अमेरिकन तज्ज्ञ अशी लस तयार करण्यात गुंतले आहेत, ज्यामुळे अनेक प्रकारच्या ट्यूमरचा कर्करोग नष्ट होऊ शकतो. या लसी 2030 पर्यंत तयार होतील. लस तयार झाल्यास लाखो लोकांचे प्राण वाचू शकतात, असे या अभ्यासाद्वारे म्हटले जाते.
फार्मास्युटिकल कंपनी मॉडर्नाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पॉल बर्टन यांनी सांगितले की, फर्म पाच वर्षांत सर्व प्रकारच्या रोग क्षेत्रांसाठी असे उपचार देऊ शकेल. आमच्याकडे असलेली लस अत्यंत प्रभावी असेल आणि अनेकांचे जीव वाचवेल. मला वाटते की आम्ही जगभरातील लोकांना वेगवेगळ्या प्रकारच्या ट्यूमर कॅन्सरसाठी लस प्रदान करू शकू. एकाच इंजेक्शनने अनेक प्रकारचे संक्रमण कव्हर केले जाऊ शकते, असेही डॉ. पॉल बर्टन म्हणाले.
याचबरोबर, असुरक्षित लोकांना देखील कोरोना, फ्लू आणि रेस्पिरेटरी सिन्सिशिअल व्हायरस (RSV) पासून संरक्षित केले जाऊ शकते. सध्या मला वाटते की आतापासून 10 वर्षांनी आपण अशा जगात पोहोचू जिथे आपण एखाद्या रोगाचे निदान ओळखता येईल आणि त्यावर उपचार करता येईल. तसेच, एमआरएनए आधारित तंत्रज्ञान वापरून यावर उपचार करू शकू, असेही डॉ. पॉल बर्टन यांनी सांगितले.