नवी दिल्ली : अत्यावश्यक औषधांच्या राष्ट्रीय यादीत ३४ नव्या औषधांचा समावेश करण्यात आल्याने अनेक कर्करोगविरोधी औषधे, अँटीबायोटिक्स (प्रतिजैविक), लसी आता अधिक स्वस्त होतील. दरम्यान, सरकारने या यादीतूून २६ औषधे हटवली आहेत. यादीत आयव्हरमॅक्टीन, म्युपिरोसिन आणि मेरोपेनेम यासारख्या संसर्ग प्रतिरोधक औषधांचा समावेश केला आहे. यादीतील औषधांची संख्या ३८४ झाली. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी अत्यावश्यक औषधांची राष्ट्रीय यादी २०२२ जारी केली. या यादीत २७ श्रेणींतील ३८४ औषधांचा समावेश आहे. अनेक कर्करोगविरोधी औषधे, अँटीबायोटिक्स, लसी व इतर औषधे आता अधिक स्वस्त होतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सबको दवाई सस्ती दवाई या दृष्टिकोनानुसार मंत्रालय विविध पावले उचलत आहे, असे ते म्हणाले. (वृत्तसंस्था)
गर्भनिरोधक, श्वसनाचीही औषधे सुधारित यादीत अंतस्रावी औषधे आणि गर्भनिरोधक फ्लूड्रोकोर्टिसोन, ओरमेलोक्सिफेन, इन्शुलिन ग्लरगाइन आणि टेनेनिग्लिटीन यांचा समावेश केला आहे. श्वसन मार्गाचे औषध मॉन्टेलुकास्ट आणि नेत्रविकारावरील औषध लॅटानोप्रोस्ट यांचा यादीत समावेश आहे. हृदय आणि रक्त वाहिन्यांच्या देखभालीसाठी वापरण्यात येणाऱ्या डाबिगट्रान आणि टेनेक्टेप्लेस याशिवाय अन्य औषधांना यादीत स्थान मिळाले आहे. संसर्ग प्रतिरोधक आयव्हरमॅक्टीन, म्युपिरोसिन, मेरोपेनेम, सेफ्युरोक्साइन, एमिकासिन, बेडाक्विलाइन, डेलामेनिड, इट्राकोनाजोल एबीसी डोलटेग्रेवीर यासारख्या औषधांनी सुधारित यादीत स्थान मिळवले आहे, असे औषधविषयक स्थायी राष्ट्रीय समितीचे अध्यक्ष डाॅ. वाय. के. गुप्ता यांनी सांगितले.
यांचा समावेश कर्करोगांसाठी उपयुक्त असलेल्या बेंडामुस्टाइन, हायड्रोक्लोराइड, इरिनोटेकन एचसीआय ट्रायहायड्रेट, लेनालेडोमाइड आणि ल्युप्रोलाइड ॲसिटेट या औषधांसह मानसोपचाराशी संबंधित निकोटीन रिप्लेसमेंट थेरपी आणि ब्यूप्रेनोर्फिन यांना यादीत स्थान आहे.
वगळलेली औषधे : तथापि, रॅनिटिडीन, सुक्रालफेट, व्हाइट पेट्रोलेटम, ॲटेनोलोल आणि मेथिडोल्पा यांच्यासह २६ औषधांना सुधारित यादीतून वगळण्यात आले आहे.