पुणे : नुकताच जागतिक मधुमेह दिन जगभरात साजरा करण्यात आला. याच विषयावर पुण्यातील मधुमेहतज्ञ डॉ स्नेहल देसाई यांच्याशी लोकमतने खास संवाद साधला. त्याचाच हा सारांश.
प्रश्न :मधुमेह कमी वयात होण्याचे प्रमाण वाढल्याचे जाणवत आहे का ?
उत्तर : हो सध्या हे प्रमाण सातत्याने वाढत आहे. पूर्वी साधारपणे चाळिशीनंतर आढळणारा मधुमेह आता अगदी तिशीच्या आताही आढळत आहे. हे येणाऱ्या पिढीसाठी धोकेदायक लक्षण आहे. तरुणांनी याचा गांभीर्याने विचार करत जीवनशैलीत बदल करायला हवा.
प्रश्न :मधुमेहाची लक्षणे काय आहेत ?
उत्तर :अशी विशेष लक्षणं मधुमेहाची नाहीत. पण चक्कर येणे, अचानक वजन कमी होणे, हातापायाला मुंग्या येणे अशी लक्षणे सर्वसाधारणे आढळतात. चाळीशीनंतरच्या आरोग्य तपासणीत रक्तातली साखर दर सहा महिन्यांनी तपासणे गरजेचे आहे. आई किंवा वडिलांना मधुमेह तर तीन महिन्यांनी तपासणी करावी.
प्रश्न :मधुमेह टाळण्यासाठी जीवनशैलीत प्रकर्षाने कोणते बदल करायला हवेत ?
उत्तर :पुरेशी झोप, योग्य आहार आणि नियमित व्यायाम या त्रिसूत्रीचा वापर केला तर मधुमेह टाळता येऊ शकतो. मधुमेह आयुष्य संपवणारा आजार नक्कीच नाही पण तो कमी वयात होणे फारसे चांगले नाही. त्यामुळे अनेक बंधने येतात. त्यामुळे थोडीशी शिस्त आणि काही नियम पळून मधुमेहाचे येणे लांबवणे शक्य आहे.
प्रश्न :मधुमेह पूर्ण बरा होतो का ?
उत्तर :मधुमेह झाला म्हणजे सगळं संपलं असं नाही. पण हा आजार कधीच पूर्ण बरा होत नाही हे आधी लक्षात घेण्याची गरज आहे. मात्र पथ्य पाळून तो नियंत्रणात ठेवणे शक्य आहे. त्यामुळे आरोग्याचे अधिक नुकसान न करता आणि मधुमेह पूर्ण बरा होतो या प्रलोभनाला न भूलता औषोधोपचार करून योग्य जीवशैली आचरणात आणण्याची गरज आहे.
प्रश्न : स्वतःला हवं तेव्हा गोळ्या कमी जास्त करणे योग्य आहे का ?
उत्तर : स्वतःच्या मानाने तज्ज्ञांच्या सल्ल्याशिवाय औषधात बदल करणे चुकीचेच नाही तर धोक्याचे आहे. याचे भयंकर परिणाम होऊ शकतात. यामुळे अचानक रक्तातली साखर कमी होऊ शकते किंवा वाढूही शकते. त्यामुळे मनाने गोळ्यांचे प्रमाण कमी जास्त करू नये.
प्रश्न : वेगवेगळ्या उपचार पद्धतींनी मधुमेह कमी होतो असे सांगितले जाते. त्यावरून अनेकदा रुग्णाचा गोंधळ उडतो, अशावेळी कोणती उपचारपद्धती वापरावी ?
उत्तर : याचे सर्वात सोपे उत्तर म्हणजे तुमचे शरीर ज्या उपचार पद्धतीला सर्वाधिक प्रतिसाद देते ते उपचार घ्यावेत. शक्यतो दोन उपचार पद्धती एकतरी घेऊ नये. घेत असाल तर दोन्ही तज्ज्ञांना तशी कल्पना द्यावी. त्यामुळे उलट त्रास होणे टाळता येते. मधुमेह हा आजार न मानता आयुष्याचा साथी मानून त्याची काळजी घेतली तर त्याचा त्रास होणार नाही हे मात्र नक्की !