मुंबई : पक्षाघात हा सर्वसाधारणपणे उतारवयात होण्याचा आजार असला, तरी अलीकडे तरुण वयातही पक्षाघात येण्याचे प्रमाण वाढले आहे. उच्च रक्तदाब, मधुमेह हृदयविकार, उच्च कोलेस्ट्रॉल, धूम्रपान, मद्यसेवन या कारणांमुळे पक्षाघात येण्याची शक्यता वाढते. जगात दरवर्षी १ कोटी ७० लाख लोकांना पक्षाघात होतो, त्यापैकी ६० लाख लोकांचा यात मृत्यू होतो. यातील ८० टक्के रुग्ण आर्थिकदृष्ट्या मागासलेले असतात. याखेरीज जगाच्या तुलनेत भारतातील तरुणाईला पक्षाघात होण्याचे प्रमाण जास्त आहे.जागतिक पक्षाघात दिनाच्या अनुषंगाने माहिती देताना डॉ. नितीन भालगुष्टे यांनी सांगितले की, पक्षाघात होण्याच्या संख्येत मोठी वाढ होत नसली तरी तरुणांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात दिसून येत आहे. लठ्ठपणा, मधुमेह, अतिरिक्त मद्यपान, धूम्रपान हे हृदय विकाराप्रमाणेच पक्षाघातासाठीही जबाबदार ठरत आहेत. याशिवाय ताणतणावाची जीवनशैलीही पक्षाघातामागे महत्त्वाचा घटक ठरू पाहत आहे. कामाच्या वेळा, आहार व आरामाकडे झालेले दुर्लक्ष, अपुरी झोप यामुळे तरुणांमध्ये पक्षाघातासारखा आजार वाढीस लागत असल्याची शक्यता आहे.डॉ. भालगुष्टे म्हणाले की, पक्षाघाताचा झटका आल्यावर पहिले तीन ते चार तास अत्यंत महत्त्वाचे असतात. हृदयविकाराप्रमाणेच पक्षाघाताचाही हा ‘गोल्डन अवर’ असतो. या काळात मेंदूमधील गाठ विरघळण्यासाठी योग्य औषधांचा वापर केला गेला तर बहुतांश रुग्णांमधील मेंदूचे कार्य २४ तासांत सुरळीत होऊ शकते.मात्र त्यासाठी रुग्णाला पक्षाघाताचा झटका आला आहे किंवा मेंदूच्या कोणत्या भागात समस्या उद्भवली आहे ते पाहावे लागते. रुग्णाचे सीटी स्कॅन आणि रक्त तपासण्या केल्यावर त्याच्यावरील उपायांची दिशा निश्चित केली जाते. पक्षाघातामुळे शरीराचा लुळा पडलेला भाग पुन्हा कार्यरत करण्यासाठी चार ते सहा महिनेही लागतात व त्यानंतरही मेंदू पूर्ण क्षमतेने काम करण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे तरूणांनी याविषयी सर्तक राहून काळजी घेणे आवश्यक असल्याचे आवाहनही त्यांनी केले.
सावधान..! तरुणाईलाही संभवतोय पक्षाघाताचा धोका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2018 1:13 AM