Causes of black tooth and gum : हिरड्यांचा रंग हा सामान्यपणे लाल किंवा गुलाबी असतो. पण अनेकदा काही लोकांच्या हिरड्यांचा रंग काळा असतो. मात्र, याचं कारण काही कुणाला माहीत नसतं. काळ्या हिरड्यांमुळे हसताना अनेकांना अवघडल्यासारखंही वाटतं. त्यासोबतच हिरड्या काळ्या असणे हा हिरड्यासंबंधी एखाद्या समस्येचा संकेतही असू शकतो. त्यामुळे यावर दुर्लक्ष करून चालणार नाही. चला आज आम्ही तुम्हाला हिरड्यांचा रंग काळा असल्याची काही कारणे सांगणार आहोत.
मेलानिन जास्त जमा झाल्याने
onlymyhealth.com या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, सामान्यपणे ज्या लोकांची त्वचा काळी असते, त्यांच्या शरीरात मेलानिन जास्त जमा झालेलं असतं. अशा लोकांच्या हिरड्या काळ्या रंगाच्या असतात. मेलानिन एकप्रकारचं तत्व आहे, ज्याला त्वचा नैसर्गिकपणे तयार करते आणि याने त्वचेचा रंग डार्क होतो. त्यामुळे जर त्वचा काळी असेल तर शक्य आहे की, तुमच्या हिरड्या गुलाबी न राहता काळ्या असतील. तशी तर काळे हिरड्या असणे ही काही समस्या नाही. पण हिरड्यांवर केवळ काळे डाग दिसत असतील तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा. कारण ही बाब सामान्य नाही.
काही औषधांचा वापर
काही औषधांचे साइड इफेक्ट्समुळेही हिरड्यांचा रंग काळा होऊ शकतो. एका रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, काही खास डिप्रेशनच्या औषधांमुळे, मलेरियाची औषधे आणि अॅंटी-बायोटिक्सच्या सेवनामुळे व्यक्तीच्या हिरड्या काळ्या दिसू शकतात. जर काही दिवसांपासून तुम्ही असं काही औषध घेत असाल आणि तुम्हाला तुमच्या हिरड्या काळ्या झालेल्या दिसत असतील तर वेळीच याबाबत डॉक्टरांशी बोला.
धुम्रपान
हे तर तुम्हाला माहीत असेलच की, धुम्रपान केल्याने कॅन्सर, फुप्फुसांची समस्या, श्वासांची समस्या, हार्ट अटॅक आणि स्ट्रोक इत्यादींचा धोका वाढतो. पण तुम्हाला हे माहीत आहे का की, धुम्रपान केल्याने तुमच्या हिरड्यांचा रंगही काळा होऊ शकतो. जे लोक सिगारेट, विडी जास्त सेवन करतात त्यांनाही ओठांच्या आणि हिरड्यांच्या काळेपणाची समस्या होऊ शकते. धुम्रपानाच्या सवयीमुळे तुमची स्माइलही खराब होऊ शकते. अनेकदा हिरड्यांचा रंग काळा होण्याऐवजी हिरड्यांवर काळे डाग दिसू लागतात. हे तोंडाच्या कॅन्सरचे सुरूवातीचे लक्षणे असू शकतात. त्यामुळे असे संकेत दिसत असतील तर वेळीच सावध होण्याची गरज आहे.
जिंजिवायटिसच्या कारणाने
हिरड्यांचा एक खास आजार असतो. ज्याला अल्सरेटिव जिंजिवायटिस असं म्हणतात. हे एकप्रकारचं इन्फेक्शन आहे. यामुळेही हिरड्यांमध्ये वेदना, ताप आणि श्वासाच्या दुर्गंधीची समस्या होऊ शकते. या इन्फेक्शनमुळे हिरड्यांचे टिशूज मरतात. ज्यामुळे त्यांचा रंग काळा होऊ शकतो. जर तुम्हाला जिंजिवायटिसची समस्या असेल तर लवकरात लवकर यावर डॉक्टरांशी बोलून उपचार घ्यावे.