डायबेटीस (Diabetes) हा गंभीर स्वरूपाचा आणि चिवट आजार समजला जातो. डायबेटीस होण्यामागे अनेक कारणं सांगितली जातात. त्यात प्रामुख्यानं बदलती जीवनशैली, चुकीचा आहार, व्यायामाचा अभाव, लठ्ठपणा आणि आनुवंशिकता या कारणांचा समावेश होतो. कोणताही आजार होण्यापूर्वी ज्याप्रमाणे त्याची लक्षणं दिसून येतात, तसंच डायबेटीसच्या बाबतीत असतं. डायबेटीस कधीच अचानक होत नाही. हा आजार होण्यापूर्वी म्हणजेच प्री-डायबेटीस स्थितीत (Pre-Diabetes) प्रमाणापेक्षा अधिक तहान लागणं, थकवा, वारंवार युरीनला जावं लागणं, अचानक वजन कमी होणं, भुकेचं प्रमाण वाढणं, हाता-पायांना मुंग्या येणं ही लक्षणं दिसून येतात.
डायबेटीस हा जीवघेणा आणि गुंतागुंतीचा आजार (Disease) आहे. जगभरात आज अब्जावधी रुग्ण डायबेटीस अर्थात मधुमेहग्रस्त आहेत. दररोज या आजाराच्या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. डायबेटीसमुळे अन्य गंभीर आजार होण्याचा धोका असतो. डायबेटीसमुळे दृष्टीवर परिणाम होऊ शकतो. तसंच नेत्रविकार (Eye Disease), हृदयविकार (Heart Disease) आणि किडनी (Kidney) निकामी होण्याचा धोका असतो. त्यामुळे या आजाराची लक्षणं दिसू लागताच तातडीनं वैद्यकीय तपासण्या करणं आणि उपचार घेणं महत्त्वाचं ठरतं. याविषयीची माहिती देणारं वृत्त 'झी न्यूज हिंदी'ने प्रसिद्ध केलं आहे.
हा आजार होण्यापूर्वी त्याची काही लक्षणं दिसू लागतात. प्री-डायबेटीस टप्प्यात ब्लड ग्लुकोजची पातळी (Blood Glucose Level) नियंत्रित राहण्यासाठी तातडीनं औषधं (Medicine) सुरू करणं आवश्यक असतं. यामुळे पुढचा धोका टाळता येतो. प्री-डायबेटीसची लक्षणं दिसू लागल्यास संबंधित रुग्णानं काही खबरदारी घेणं आवश्यक असतं. कारण सर्वसामान्यपणे प्री-डायबेटिक व्यक्तीला डायबेटिस टाइप -2 होण्याची शक्यता अधिक असते.
आरोग्य उत्तम राहण्यासाठी योग्य वेळी जेवणं महत्त्वाचं आहे. प्री-डायबेटीसचे रुग्ण असाल तर दोन जेवणातल्या अंतराकडे विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. डायबेटीस टाळण्यासाठी, तसंच ब्लड शुगर नियंत्रणासाठी पुरेशी झोप (Sleep) आवश्यक आहे. प्री-डायबेटीस असणाऱ्या रुग्णांनी रोज 7 ते 8 तास झोप घेणं आवश्यक आहे. यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि मानसिक तणाव कमी होतो. तसंच हॉर्मोनल बॅलन्स (Hormones Balance) योग्य राहतो.
प्री-डायबेटीस असणाऱ्या रुग्णांनी साखर आणि साखरयुक्त पदार्थ खाणं वर्ज्य करावं. याऐवजी नैसर्गिक साखरेचा स्रोत असलेली फळं, मध आणि गुळापासून तयार केलेले पदार्थ सेवन करावेत. तुम्हाला प्री-डायबेटीसची लक्षणं दिसत असतील तर त्यावर योगासनं (Yoga) करणं हा सर्वोत्तम उपाय आहे. कारण यामुळे स्वादुपिंडाचं कार्य सुधारतं. त्यामुळे रोज योगासनं केल्यास नक्कीच फायदा दिसून येतो.