खोकला ही एक सामान्य समस्या आहे. अनेकदा सर्दी झाल्यानंतर खोकल्याची समस्या उद्भवते. मात्र, जर खोकल्यातील कफाबरोबर रक्त येत असेल तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. हे एका गंभीर समस्येचं लक्षण असू शकतं. खोकल्यातील कफामध्ये रक्त येणं हे 'हेमोप्टिसिस' समस्येचं लक्षण आहे. ही समस्या इन्फेक्शन किंवा कॅन्सरसारख्या मोठ्या आजाराचं प्रारंभिक लक्षण असू शकते. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणं शरीरासाठी घातक ठरू शकतं. या समस्येवर शक्य तितक्या लवकर उपचार केले पाहिजेत. जास्त उशीर झाल्यास शस्त्रक्रियादेखील करावी लागू शकते.
कफाचं परीक्षण करून, लॅब टेस्टच्या माध्यमातून, एक्स-रे किंवा ब्रॉन्कोस्कोपीद्वारे हेमोप्टिसिसचं निदान केलं जाऊ शकतं. कोणकोणत्या कारणांमुळे एखादी व्यक्ती हेमोप्टिसिसला बळी पडू शकते याची आपण अधिक माहिती घेऊया.
हेमोप्टिसिसची कारणं1) व्हेरी वेल हेल्थ डॉट कॉमच्या मते, न्यूमोनिया, ब्रॉन्कायटिस किंवा टीबीमुळे खोकताना रक्त येऊ शकतं. तसंच कोणत्याही फंगल इन्फेक्शनमुळेही हेमोप्टिसिस होऊ शकतो.
2) खोकल्यातून येणारं रक्त हे कॅन्सरसारख्या मोठ्या समस्यांशी संबंधित असल्याचंही निदर्शनास आलं आहे. घशाचा कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर किंवा रक्ताचा कॅन्सर असल्यासही हेमोप्टिसिसची समस्या दिसते.
3) अँटिकोआगुलंट्स नावाच्या औषधामुळे रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. या औषधाच्या जास्त सेवनामुळेही हेमोप्टिसिस होऊ शकतो. पल्मनरी एम्बोलिझम या फुफ्फुसातील रक्ताच्या गाठींमुळेही खोकताना कफासह रक्त येतं. याशिवाय, कधीकधी गंभीर दुखापतीमुळे होणारा अंतर्गत रक्तस्रावही हेमोप्टिसिससाठी कारणीभूत ठरू शकतो.
हेमोप्टिसिसची लक्षणं1) हेमोप्टिसिस झालेल्या व्यक्तीमध्ये ही समस्या किती गंभीर आहे, हे रक्ताच्या रंगावरून आणि प्रमाणावरून दिसून येतं. खोकल्यामध्ये रक्त येणं हे त्याचं सर्वांत मोठं आणि एकमेव लक्षण आहे. जर खोकल्याबरोबर रक्ताचे ठिपके किंवा रक्ताचे थेंब येत असतील तर हे हेमोप्टिसिसचं लक्षण असू शकतं.
2) तुम्हाला खोकल्यामध्ये रक्ताचा अगदी थोडासाही ट्रेस दिसला तर ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या. त्यापासून सुटका मिळवण्यासाठी उपचार घ्या. हेमोप्टिसिसवर औषधांनी नियंत्रण मिळवता येतं. पण, तो मुळापासून नष्ट करण्यासाठी त्याला कारणीभूत ठरलेला रोग बरा करणं आवश्यक आहे.
जर तुम्हाला किंवा तुमच्या संपर्कातील एखाद्या व्यक्तीला खोकल्यातून रक्त येण्याची समस्या जाणवत असेल तर घाबरून जाऊ नये. तत्काळ डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते उपचार सुरू करावेत.