खोकल्यामुळे तुमची दैनंदिन कामे सहजतेने करू शकत नाही का? थकवा किंवा अचानकपणे वजन कमी झाले आहे का? तुम्हाला नेहमीच दम लागतो का? मग, तुम्हाला ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा लागेल कारण ही सारी लक्षणं पल्मोनरी फायब्रोसिसचीदेखील असू शकतात.
पल्मोनरी फायब्रोसिस हा एक फुफ्फुसाचा आजार आहे. या आजारात फुफ्फुसाच्या उतींना इजा आणि जखमा होतात. घट्ट, कडक झालेल्या उतींमुळे फुफ्फुसांना सक्षमरित्या कार्य करणे आव्हानात्मक ठरते. फुफ्फुसातील फायब्रोसिसमुळे एखाद्या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होतो. साथींच्या आजारादरम्यान, अनेक पोस्ट-कोविड रुग्णांबाबत या आजाराचे निदान झाले असून त्यासाठी त्वरित वैद्यकीय कारवाई आवश्यक आहे. यामुळे मानसिक शांततेवर परिणाम होऊ शकतो. दैनंदिन कामे करण्याची रुग्णाची कार्यक्षमता कमी होते. पल्मोनरी फायब्रोसिसमुळे फुफ्फुसाचे नुकसान होते. यामुळे लवकर निदान, जलद उपचार, पुरेसे हायड्रेशन आणि जीवनसत्त्व सी आणि झिंक सप्लीमेंटमुळे फुफ्फुसातील फायब्रोसिस व्यवस्थापित करण्यासाठी फायदेशीर ठरते, असे वरिष्ठ सल्लागार रेस्पिरेटरी/पल्मोनरी मेडिसिन, एसीआय कम्बाला हिल रुग्णालयाचे डॉ. श्याम थंपी यांनी हिंदुस्तान टाईम्सला सांगितले आहे.
पल्मोनरी फायब्रोसिसची लक्षणे- श्वासोच्छवासाचा त्रास (डिस्पनिया), वजन कमी होणे, थकवा, कोरडा खोकला, अशक्तपणा, अचानकपणे वजन कमी होणे, स्नायू दुखणे आणि बोटांचे टोक गोलाकार होणे (क्लबिंग) ही लक्षणे दिसू लागतात. प्रत्येक रुग्णांमध्ये ती वेगवेगळी असून कालांतराने त्यात वाढ होत जाते. या स्थितीमुळे जीवही गमवावा लागू शकतो.
- फुफ्फुसातील हवेच्या पिशव्या (अल्व्होली)आणि उती जाड आणि डाग झाल्यासारख्या दिसतात. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊन श्वास घ्यायला त्रास होतो. काही विषारी घटक, वैद्यकीय परिस्थिती, रेडिएशन थेरपी आणि औषधे फुफ्फुसाच्या नुकसानास कारणीभूत ठरू शकतात. अशावेळी डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या. ज्यांना श्वासोच्छवासाच्या समस्या आहेत आणि नंतर कोविड - 19 ची लागण झाली आहे, अशा काही रुग्णांमध्ये ही लक्षणे आढळली आहेत.
पल्मोनरी फायब्रोसिस रोखण्यासाठी उपायअँटीबायोटिक्स, कॉर्टिकोस्टेरॉइड औषधे, अँटीफायब्रोटिक्स किंवा इतर औषधे घेण्याचा सल्ला डॉक्टर हा आजार रोखण्याकरिता देतात. कार्यक्षमता वाढवण्यासाठी दररोज व्यायाम करणे, फुफ्फुसाचे आरोग्य सुधारण्यासाठी श्वासोच्छवासाची तंत्रे, समुपदेशन, वेळीच उपचार घेणे आवश्यक आहे. रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी जीवनसत्त्व सप्लिमेंट घेण्याचा सल्ला दिला जाऊ शकतो. मुख्यत: अशावेळी धूम्रपान करू नका आणि पॅसिव्ह स्मोकींग देखील टाळा. रोजच्या आहारात ताजी फळे, कडधान्ये आणि दुग्धजन्य पदार्थांची निवड करा. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधे घ्या. स्वत:च्या मर्जीने औषधोपचार करू नका.