महिलांमध्ये सर्व्हायकल कॅन्सरचं प्रमाण वाढत आहे. फेडरेशन ऑफ ऑब्स्टेट्रिक अँड गायनेकॉलॉजिकल सोसायटीज ऑफ इंडिया (FOGSI) महिलांमध्ये लसीकरणाबाबत जागृकता निर्माण करण्याचं काम करत आहे. HPV पासून सुरक्षेसाठी मुलींनी आणि विशेषत: गरोदर महिलांनी लसीकरण करुन घेण्याचं त्यांनी आवाहन केलं आहे. फॉगसी आणि MSD फार्मा कंपनीकडून सध्या जागोजागी महिला कवच केंद्र बनवण्यात आले आहेत. आज मुंबईत आयोजित कार्यक्रमात अभिनेत्री काजल अग्रवालच्या (Kajal Aggrawal) हस्ते लसीकरण शेड्यूलचं उद्घाटन करण्यात आलं.
महिलांमध्ये लसीकरणाच्या जागृकतेसाठी मुंबईत MSD आणि फॉगसीकडून कार्यक्रम आणि पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं. यामध्ये डॉक्टरांच्या उपस्थितीत एक पॅनल डिस्कशन घेण्यात आलं. महिलांमध्ये प्रीव्हेंटिव्ह लसीकरणाविषयी जागृकता निर्माण करणे हेच कार्यक्रमाचे उद्दिष्ट होते. लहानपणी लस घेतल्यानंतर महिला नंतर थेट गरोदरपणावेळी गायनॉकॉलिस्टकडे जातात. या मधल्या काळात त्यांना शरीरात नक्की काय बदल होत आहेत हे समजत नाही. विशेषत: गरोदरपणी मातांनी ही लस घेण्याची आवश्यकता आहे. महिलेच्या आणि बाळाच्या सुरक्षेसाठी हे गरजेचे आहे.
यावेळी अभिनेत्री काजल अग्रवाल म्हणाली, "एक आई म्हणून आपण तेव्हाच आपल्या मुलांची काळजी घेऊ शकतो जेव्हा आपण स्वत: निरोगी असतो. त्यामुळे प्रत्येक महिलेने स्वत:च्या आरोग्याला प्राधान्य देण्याची गरज आहे. ही लस तुम्हाला जीवनदान देणारीच आहे. म्हणून प्रत्येक मुलगी आणि महिलेला हीच विनंती की तिने आजच स्त्री रोग तज्ञाकडे जाऊन लसीकरणाबाबत माहिती घ्यावी."
'फॉगसी' च्या सेक्रेटरी जनरल डॉ माधुरी पटेल म्हणाल्या, "प्रत्येक महिलेसाठी बाळाच्या जन्मानंतरचा काळ खूप महत्वाचा असतो. या काळात महिलेच्या शरिरात अनेक हार्मोनल बदल होतात. यामुळे संक्रमणाचा धोका वाढतो. उदाहरणार्थ ३१ टक्के मातांना HPV संक्रमणाचा धोका असतो. म्हणून गरोदर महिलांमध्ये लसीकरण जास्त महत्वाचं आहे."
'फॉगसी' या संस्थेत 275 सदस्यांचा समावेश आहे. महिलांना सर्व्हायकल कॅन्सर आणि लसीकरणाविषयी शिक्षित करणे हा त्यांचा हेतू आहे.