नवी दिल्ली - देशात दरवर्षी अनेक महिलांचा गर्भाशयाच्या कॅन्सरने (Cervical Cancer) मृत्यू होतो. मात्र आता एक खूशखबर आहे. महिलांचा मोठा शत्रू असलेल्या गर्भाशयाच्या कॅन्सरवर पहिली स्वदेशी लस लाँच करण्यात आली आहे. हा कॅन्सर रोखण्यासाठी स्वदेशी बनावटीची पहिली 'क्वाड्रिव्हॅलेंट' ह्युमन पेपीलोमा व्हायरस (HVP) लस आज लाँच करण्यात आली. केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह आणि SII सीईओ अदर पूनावाला यांनी आयआयसी दिल्ली येथे लॉन्च केली. भारतीय फार्मा रेग्युलेटर DCGI ने गेल्या महिन्यात SII ला गर्भाशयाच्या कॅन्सरची लस तयार करण्याची परवानगी दिली.
गर्भाशयाच्या कॅन्सरच्या लसीची किंमत 200 ते 400 रुपये आहे. मात्र, अंतिम किंमत अद्याप ठरलेली नाही. पूनावाला म्हणाले की, गर्भाशयाच्या कॅन्सरची लस येत्या काही महिन्यांत देशात उपलब्ध होईल. तेही लस प्रथम देशात उपलब्ध करून दिली जाईल आणि नंतर ती जगाला पुरविली जाईल. येत्या दोन वर्षांत या लसीचे 20 कोटी डोस भारतात तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न असल्याचं देखील सांगितलं आहे. ही लस गर्भाशयाचा कॅन्सर रोखण्यात यशस्वी ठरेल, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मुलींना ही लस लहान वयातच दिल्यास त्या अशा संसर्गापासून सुरक्षित राहतील असंही म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, देशात दरवर्षी गर्भाशयाच्या कॅन्सरचे 1 लाख 67 हजारांहून अधिक रुग्ण आढळतात. यामध्ये 60 हजारांहून अधिक महिलांचा मृत्यू होतो. WHO च्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये भारतातील 42 लाख महिलांना गर्भाशयाच्या कॅन्सरमुळे आपला जीव गमवावा लागला.
गर्भाशयाचा कॅन्सर काय आहे?
- गर्भाशय कॅन्सरचा सर्व महिलांना धोका आहे.
- गर्भाशयाचा कॅन्सर हा भारतातील 15-44 वयोगटातील महिलांमध्ये आढळतो. हा आजार 30 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या महिलांमध्ये होऊ शकतो.
- कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्या स्त्रियांना गर्भाशयाचा कॅन्सर 5-10 वर्षांतच होऊ शकतो. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.