- मयूर पठाडेआपली झोप झालेली नसेल, तर दुसरा दिवस किती डल जातो ना? काहीच सुचत नाही. काहीच करावंसं वाटत नाही. अख्खा दिवस आळसावलेला जातो. उत्साह नावाची तर गोष्टच नसते. कंटाळा येतो. काहीच करण्यात रस नसतो.. सगळं चैतन्यच हरवलेलं असतं.पण तेच झोप जर व्यवस्थित झालेली असेल, पुरेशी झोप घेतलेली असेल, तर दिवसभर आपल्या अंगात उत्साह कसा फसफसलेला असतो. सगळी कामंही झपाट्यानं होतात. थोडक्यात झोप आणि आपलं आरोग्य यात अत्यंत जवळचा संबंध आहे.पण लहान मुलांच्या बाबतीत तर हे आणखीच खरं आहे. पण बऱ्याच पालकांची तक्रार असते, आमची मुलं वेळेवर झोपत नाहीत, उठत नाहीत, उठवलं तरी उठत नाहीत आणि अगदीच बळजबरी केली, तर मग किरकिर, रडारड करतात.. काय करावं हेच आम्हाला सुचत नाही..
खरंतर मुलं सकाळी लवकर उठत नाहीत, कारण रात्री ती लवकर झोपत नाहीत. रात्री वेळेवर, योग्य वेळी झोपली नाहीत, तर सकाळी उशिरापर्यंत मुलं झोपली तरी त्यांची झोप व्यवस्थित पूर्ण होत नाही. कारण आपल्याला शांत झोप लागण्याचाही ठराविक काळ असतो. त्या वेळेत झोपलं तर आपली झोप बऱ्यापैकी पूर्ण होते आणि दुसरा दिवसही मग उत्साहात जातो.याबाबत संशोधकांनी नुकताच एक सर्व्हे केला आणि काही निरीक्षणं मांडली. संशोधक म्हणतात, आपल्या मुलांनी वेळेवर झोपावं ही पालकांचीच जबाबदारी आहे. आणि त्यांनी वेळेवर झोपावं यासाठी लहानपणापासूनच त्यांना तशी सवय लावणं गरजेचं आहे. पालकांनी तशी नियमावलीच बनवायला हवी. मुलांची रोज ठराविक वेळी झोपण्याची सवय असेल तर त्याचा मुलांच्या आरोग्यावर नक्कीच सकारात्मक परिणाम होतो, ‘आमचा मुलगा रोज रात्री बारा-एकशिवाय झोपत नाही’, असं कौतुकानं सांगण्याचीही अनेक पालकांना सवय असते, पण ही कौतुकाची गोष्ट नक्कीच नाही. उलट पालकत्वाबाबत आपण कमी पडत आहोत हे समजून घेण्याची गोष्ट आहे. अपुऱ्या झोपेचा मुलांवरकाय परिणाम होतो?
१- मुलं जर रोज योग्य आणि ठराविक वेळा झापायला गेली तरच त्यांची झोप पूर्ण होते आणि त्यांना पुरेसा आराम मिळतो.२- मुलांची झोप जर पूर्ण झाली नाहीतर त्यांच्या वाढीवर तर परिणाम होतोच, पण भविष्यकाळावरही त्याचा परिणाम होतो आणि त्यांची ती लाइफस्टाइलच बनून जाते.३- पूर्ण आणि शांत झोप जर मुलांना लागत नसेल, तर त्यानं किती प्रॉब्लेम्स त्यांच्यात तयार व्हावेत?४-अपुऱ्या झोपेमुळे मुलांची एकाग्रता कमी होते. त्यांचा अटेन्शन स्पॅन कमी होतो. ५- अभ्यासावर परिणाम होतो. शालेय अभ्यासात ती मागे पडू शकतात. त्यांचे परिक्षेतले गुण कदाचित ‘उत्तम’ दिसत असले तरीही एकतर तो घोकंपट्टीचा परिणाम असतो, किंवा त्यापेक्षा कमी अभ्यास करूनही त्यांनी अधिक ज्ञान संपादन केलं असतं. ६- अशा मुलांचा सामाजिक सहभाग तुलनेनं बराच कमी असतो. ती एकलकोंडीही असू शकतात.७- मुलं कायम किरकिरी आणि चिडचिडीच राहातात.