- मयूर पठाडे
मुलांचं लहानपण जितकं सुखात, आनंदात आणि पालकांच्या छत्रछायेखाली उबदार वातावरणात जाईल, तितकी ती मुलं भविष्यात जबाबदार नागरिक बनतील, हे एव्हाना सिद्ध झालेलं आहे.
त्यामुळेच ज्यांचं बालपण विपरित परिस्थित किंवा गुन्हेगारी जगताच्या पार्श्वभूमीवर गेलेलं आहे, अशा व्यक्ती त्यांच्या उत्तरायुष्यात गुन्हेगारच बनल्याचं आढळून येतं.
तुरुंगात असलेल्या अनेक नामचिन गुंडांचा आणि त्यांच्या पुर्वायुष्याचा अभ्यास केल्यावर ते ‘असे’ का झाले याचं उत्तर त्यांच्या बालपणातच सापडतं. या गुन्हेगारांनी स्वत:ही त्याबद्दल ‘परिस्थिती’लाच दोष दिलेला आहे.
याचा अर्थ गुन्हेगारी वातावरणात वाढलेली प्रत्येक व्यक्ती गुन्हेगारच बनेल असं नाही, पण गैरमार्गाकडे वळण्याची त्यांची शक्यता खूप जास्त असते.
त्यामुळेच मुलांचं लहानपण चांगल्या वातावरणात जाणं खूप आवश्यक आहे.
घरची परिस्थिती कशी आहे यावरही मुलं भविष्यात काय बनतील, काय करतील हे बरंचसं अवलंबून असतं.
संशोधकांनी बरीच वर्षे संशोधन करून आता आणखी एक नवीन निष्कर्ष काढला आहे. तुमचं लहानपण जर खूपच गरिबीत आणि हलाखीत गेलं असेल तर त्याचा तुमच्या भविष्यावर तर परिणाम होतोच, पण इतरांपेक्षा तुम्ही वयातही खूप लवकर येता. जबाबदार्या लवकर अंगावर पडल्यानं तुमचं बालपण तर कोमेजतच, लहान वयातच तुम्हाला अनेक गोष्टी सांभाळाव्या लागतात, पण नैसर्गिकरित्याही तुम्ही लवकर वयात येता, तुमच्या वयाच्या इतर मुलामुलींपेक्षा तुम्ही लवकर तारुण्यात येता, हेदेखील शास्त्रज्ञांनी सिद्ध केलं आहे.
त्यामुळे पालकांनो, लक्षात ठेवा, आपली परिस्थिती जरी गरिबीची असेल, तरीही लहान वयातच आपल्या मुलामुलींना कामाला जुंपू नका. नको त्या वयात त्यांना न झेपणार्या जबाबदार्या सोपवल्या तर त्यांचं बालपण नक्कीच कोमेजेल आणि त्यांना अकाली प्रौढत्वही येईल.