चीनमध्ये वेगाने पसरणाऱ्या HMPV व्हायरसमुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे जगाचं टेन्शन वाढलं आहे. चायना डिसीज कंट्रोल ऑथॉरिटीने गेल्या महिन्याच्या अखेरीस याबाबत एक रिपोर्ट जारी केला आणि सांगितलं की, देशात एक विचित्र प्रकारचा न्यूमोनिया पसरत आहे, ज्याची कारणं अज्ञात आहेत. या व्हायरसशी संबंधित गोष्टी जाणून घेऊया.
HMPV व्हायरस किती धोकादायक?
रिपोर्टनुसार, एचएमपीव्हीमध्ये फ्लूसारखी लक्षणं दिसत आहेत. यामुळे कोरोना सारख्याच आरोग्य समस्या निर्माण होत आहेत. रॉयटर्सच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, चीनच्या डिजीज कंट्रोल अथॉरिटीने शुक्रवारी सांगितलं की, ते अज्ञात प्रकारच्या न्यूमोनियावर लक्ष ठेवून आहेत. हिवाळ्यात श्वसनाचे आजार वाढण्याची शक्यता आहे. याला सामोरे जाण्यासाठी एक विशेष प्रोटोकॉल तयार करण्यात आला आहे. मात्र व्हायरसमुळे चिनी अधिकारी चिंतेत असल्याचंही म्हटलं जात आहे. लोकांना मास्क घालण्याचे आणि वारंवार हात धुण्याचे आवाहन केले जात आहे.
HMPV व्हायरसची लक्षणं
या व्हायरसची लक्षणं कोरोनासारखीच आहेत. या आजाराने ग्रस्त व्यक्तीला जास्त ताप, सर्दी आणि खोकला, नाक बंद होणं किंवा नाक गळणं, घसा खवखवणं, थकवा आणि अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास होणं, छातीत दुखणं, न्यूमोनिया, ब्रॉन्कायलाइटिस सारखी लक्षणं दिसतात. मुलांमध्ये या आजाराच्या थोडी वेगळी लक्षणं दिसतात. त्यांना अन्न गिळण्यास त्रास होतो, मूड बदलतो, चिडचिड होते आणि नीट झोप लागत नाही.
'या' लोकांना सर्वाधिक धोका
लहान मुलं आणि वृद्धांना HMPV व्हायरसचा सर्वाधिक धोका असतो. कोरोनामध्येही या दोघांना अधिक समस्यांचा सामना करावा लागला. या व्हायरसचा वाढता प्रादुर्भाव पाहता चीनला सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. प्रत्येकाला स्वच्छता राखण्याचे आणि मास्कशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
HMPV व्हायरस कसा टाळायचा?
- खोकताना किंवा शिंकताना तोंडावर रुमाल किंवा कपडा ठेवा. खोकण्यासाठी आणि शिंकण्यासाठी वेगळा रुमाल किंवा टॉवेल वापरा.
- जर तुम्हाला सर्दी झाली असेल तर मास्क घाला. घरी राहा आणि विश्रांती घ्या.
- यूएस सरकारच्या सीडीसीनुसार, किमान २० सेकंद साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुवा.
- तुमची भांडी, (कप, ताट किंवा चमचे) एकमेकांसोबत शेअर करू नका.
आतापर्यंत, या व्हायरसवर कोणतेही विशेष अँटी-व्हायरल औषधं किंवा कोणतीही लस तयार केलेली नाही. त्यासाठी साधारणपणे सर्दी, तापाची औषधे दिली जातात, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. परंतु ज्यांना आधीच श्वसनासंबंधित आजार आहेत त्यांच्यासाठी हा व्हायरस समस्या निर्माण करू शकतो. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या