चीनमधील लहान मुलांना लक्ष्य करणाऱ्या रहस्यमयी निमोनिया बॅक्टेरियाचे भारतात सात रुग्ण सापडल्याच्या वृत्ताने देशभरातील पालकांत खळबळ उडाली होती. परंतू, भारत सरकारने हे फेटाळले आहे. दिल्लीतील एम्समध्ये उपचार घेतलेल्या न्युमोनियाच्या रुग्णांचा चीनमधील आजाराशी कोणताही संबंध नसल्याचे म्हटले आहे.
दिल्लीच्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एम्स) रुग्णालयात एप्रिल ते सप्टेंबर दरम्यान मायकोप्लाझ्मा न्यूमोनियाची सात प्रकरणे आढळून आली होती. AIIMS ने PCR आणि IDM-ELISA या दोन चाचण्यांद्वारे चीनमध्ये मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया या लहान मुलांमध्ये श्वसनाचे आजार निर्माण करणार्या बॅक्टेरियाची सात प्रकरणे नोंदवली आहेत. लॅन्सेट मायक्रोबमध्ये प्रकाशित झालेल्या या अहवालात असे म्हटले आहे की संसर्गाच्या सुरुवातीच्या टप्प्यात पीसीआर चाचणीद्वारे एक प्रकरण आढळले होते तर उर्वरित सहा प्रकरणे IGM ELISA चाचणीद्वारे आढळून आली होती.
परंतू भारत सरकारने यावर खुलासा करत AIIMS दिल्लीमध्ये बॅक्टेरियाची प्रकरणे आढळल्याचा दावा करणारे मीडिया अहवाल दिशाभूल करणारे आणि चुकीचे आहेत असे म्हटले आहे. मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया हे समुदाय-अधिग्रहित न्यूमोनियाचे सर्वात सामान्य जिवाणू आहेत. एम्स दिल्लीतील न्यूमोनिया प्रकरणांचा चीनमधील मुलांमध्ये श्वसन संक्रमणाच्या अलीकडील वाढीशी कोणताही संबंध नाही, असे भारत सरकारने स्पष्ट केले आहे.
चीन आणि इतर अनेक युरोपीय देशांमध्ये 'वॉकिंग न्यूमोनिया'च्या घटनांमध्ये वाढ होत आहे. चार वर्षांपूर्वी डिसेंबर 2019 मध्ये कोरोना चीनमधून सुरू झाला आणि जगभरात पसरला होता. यामुळे आताच्या न्युमोनियाची भीती जगभरात पसरली आहे. कोरोनामध्ये मुलांना फारसा धोका नव्हता. परंतू, चीनमध्ये लहान मुलांना न्युमोनियाचे सर्वाधिक संक्रमण होत आहे.