सिगारेट ओढणे आरोग्यासाठी किती हानिकारक आहे हे सर्वांनाच माहीत आहे. पण तरुणाई यापासून बचाव करण्यासाठी फ्लेवर सिगारेट वापरू लागले आहेत. खासकरुन लवंग फ्लेवरची सिगारेट अधिक वापरली जाते. याबाबत त्यांचा असा समज असतो की, याने नुकसान कमी होतं. कारण यात ४० टक्के लवंग आणि ६० टक्के तंबाखू असतो. लवंग फ्लेवरची क्रेझ जास्त करून तरुणांमध्ये बघायला मिळते, जे तरुण केवळ फॅशन म्हणून सिगारेट ओढणे सुरू करतात त्यांच्यात हे प्रमाण अधिक बघायला मिळतं. तसेच फ्लेवर्ड सिगारेटची जास्त क्रेझ तरूणींमध्ये बघायला मिळते. पण काय खरंच लवंग फ्लेवर असलेल्या सिगारेटमुळे आरोग्याचं कमी नुकसान होतं? चला जाणून घेऊ याचं सत्य...
लवंग फ्लेवर सिगारेट किती हानिकारक ?
'द हेल्थ साइट' या आरोग्य वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, जे तरूण किंवा तरूणी या सिगारेटला हेल्दी समजून पर्याय म्हणून याचं सेवन करत आहेत, त्यांना हे कळायला हवं की, या सिगारेटमध्येही निकोटीनचं प्रमाण आहे. सामान्य सिगारेटमध्ये जवळपास १३ मिलीग्रॅम निकोटीन असतं तर लवंग फ्लेवर असलेल्या सिगारेटमध्ये ७.४ मिलीग्रॅम निकोटीन असतं. पण अनेकांना हे माहीत नसतं की, यातून निघणाऱ्या क्रेटेक टारचं प्रमाण यात जास्त असतं. हा टार तुमच्या फुफ्फुसांमध्ये जाऊन चिटकतो.
या लवंग फ्लेवर सिगारेटमध्ये जवळपास ३४ ते ६५ ग्रॅमपर्यंत टार निघतो. अनेक शोधांमधून हे समोर आलं आहे की, लवंग फ्लेवर सिगारेटमध्ये सामान्य सिगारेटपेक्षा अधिक जास्त प्रमाणात कार्बन मोनोऑक्साइड आणि टार निघतो. ज्याने फुफ्फुसाचं नुकसान होतं.
कॅन्सरचा धोका
सिगारेटमध्ये लवंग असल्याने याचा अर्थ हा होत नाही की, याने तुम्हाला कॅन्सरचा धोका नसतो. तज्ज्ञ सांगतात की, लवंग फ्लेवर सिगारेट ओढून कॅन्सरचा धोका तीन पटीने अधिक वाढतो.
दातांसाठी हानिकारक
अनेकांना हे माहीत नसतं की, लवंग असलेली सिगारेट ओढल्याने दात खराब होतात. तसा तर अनेक टूथपेस्ट आणि डेंटल प्रॉडक्टमध्ये लवंगचा वापर दातांच्या आरोग्यासाठी होतो. पण जेव्हा याचा वापर सिगारेटच्या रुपात केला जातो तेव्हा याने दातांचं जास्त नुकसान होतं.
कूल दिसण्यासाठी सिगारेटची सवय
देशभरातील ५० टक्के तरुण-तरुणी फक्त यासाठी धूम्रपान करतात कारण त्यांचं म्हणणं आहे की, यामुळे तणाव कमी होतो तसंच मित्रांमध्ये 'कूल' इमेज तयार होते. एका सर्व्हेक्षणानुसार, ५२ टक्के तरुणांनी धुम्रपान केल्याने एकाग्रता वाढण्यास मदत मिळते असा दावा केला आहे. तर ९० टक्के तरुणांनी सांगितलं आहे की, जर त्यांच्या आई-वडिलांनी धुम्रपानास विरोध केला नाही तर ते धुम्रपान करणं सुरु ठेवतील. दुसरीकडे ८० टक्क्यांहून जास्त जणांचं एकदा धुम्रपान करण्यात काहीच हरकत नसल्याचं म्हणणं आहे.