देशाची राजधानी दिल्लीच नाही तर वेगवेगळी शहरेही प्रदूषणाची झळ सोसत आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजेच WHO च्या रिपोर्टनुसार, जगातल्या सर्वात प्रदूषित शहरांमध्ये भारतातील १२ शहरांचा समावेश आहे. देशाची वाढती औद्योगिक प्रगती पाहता, जंगलांची तोड पाहता आणि वाहनांची वाढणारी संख्या पाहता हे प्रदूषण आणखी वाढणार यात काही लपलेलं नाही. अशात काही वर्षांनी स्वच्छ हवा विकत घ्यावी लागली तर नवल नको. या दृष्टीने काही कंपन्या पावलेही उचलताना दिसत आहेत.
कॅनमध्ये मिळणार स्वच्छ हवा
स्वच्छ हवेची विक्री करणाऱ्या कॅनडातील वायटॅलिटी एअरने २०१५ मध्ये चीनमधील अस्वच्छ हवा पाहता दोन साईजमध्ये फ्रेश एअर कॅन लॉन्च केले होते. हे कॅन पाहता पाहता विकले गेले होते आणि आताही विकले जात आहेत. ही कंपनी आता चीननंतर भारताला सर्वात मोठी बाजारपेठ मानत आहे. कंपनीचे मालक मोसेस लाम म्हणाले की, भारत प्रदूषणाच्या बाबतीत चीनच्या जवळ आहे. त्यामुळे आम्हाला इथेही कॅन विकायच्या आहेत. कंपनीने टेस्ट मार्केटिंगसाठी भारतात साधारण १०० कॅन्स पाठवल्या आहेत. भारतात कंपनीचे प्रमोशनल आणि सोशल मीडिया कॅम्पेनही सुरु झाले आहेत. वायटॅलिटी एअर भारतात स्वच्छ हवा विकण्यासाठी वॅंकुअर बेस्ड जस्टिन धालीवाल कंपनीसोबत मिळून काम करणार आहे.
किती रुपयात मिळणार हवा?
वायटॅलिटी एअर भारतात ३ ते ८ लिटरच्या कॅन लॉन्च करण्याची योजना आखत आहे. कंपनीकडून जाहीर करण्यात आलेल्या रेटनुसार ३ लिटरच्या कॅनची किंमत १४५० रुपये आणि ८ लिटर कॅनची किंमत २८०० रुपये असेल. कंपनीननुसार, ३ लिटरमध्ये ६० आणि ८ लिटरमध्ये १८० हवेचे शॉट्स असतील. अशात ३ लिटर कॅनमधून हवेचा एक शॉट २४.१६ रुपयांना पडेल आणि ८ लिटर कॅनमधील एक हवेचा शॉट १५.५५ रुपयांना पडेल. वायटॅलिटी एअरसोबतच चीनची मल्टीमिलेनिअर चेन गुआंगबियाओ आणि न्यूझीलंड बेस्ड किविआना या कंपन्याही हवा विकत आहेत. चीन, कॅनडा आणि मध्य आशियातील देश या हवेच्या कॅनची मोठी बाजारपेठ आहे.
दिवाळीनंतर वाढतात अस्थमाचे रुग्ण
दिल्लीसह अनेक शहरांमध्ये वायूप्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. येथील हवा श्वास घेण्यासाठी अत्यंत घातक असून यामुळे कॅन्सरसारख्या जीवघेण्या आजारांसोबतच स्किन प्रॉब्लेम्स आणि श्वसनासंबंधी विकारांनी अनेक जण त्रस्त आहेत. ग्लोबल स्टडीद्वारे करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार, दक्षिण-पूर्व आशियाई देशांमध्ये आणि विशेषतः भारत आणि चीन या देशांमध्ये अस्थमाच्या रूग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.
358 मिलियन लोक अस्थमाने ग्रस्त
युरोपमधील यॉर्क विश्वविद्यालयातील संशोधकांच्या मते, अस्थमा जगभरामधील सर्वात जुना आजार आहे. सध्या या आजाराने जवळपास 358 मिलियन लोक ग्रस्त झाले आहेत.
मुख्य कारण : गाड्यांमधून बाहेर पडणारा धूर
जनरल एन्व्हायर्नमेंट हेल्थ परस्पेक्टिव (Journal Environmental Health Perspectives) यामध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार, गाड्यांमधून बाहेर पडणारा धूर प्रदूषण आणि अस्थमासारख्या अटॅकचं मुख्य कारण आहे. दरवर्षी 9 ते 23 मिलियन अस्थमाच्या रूग्णांना अस्थमाचा अटॅक ओझोन लेअरमध्ये वाढणाऱ्या प्रदूषणामुळे पडतो.