जेव्हा फार झोप येत किंवा थकवा जाणवतो. त्यावेळी अनेकजण कॉफीचा आधार घेतात. कॉफी पिण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, कॉफी प्यायल्याने हृदयासंबंधातील विकार दूर होतात. त्याचप्रमाणे मेंदूचे आरोग्यही चांगले राहते. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका संशोधनातून आणखी एक गोष्ट समोर आली आहे. ज्या लोकांना किडनीसंबंधी आजार आहेत अशा लोकांनी कॉफीचं सेवन करणं फायदेशीर ठरतं.
संशोधनानुसार, कॉफी प्यायल्याने किडनीसबंधित आजारांनी ग्रस्त असणाऱ्या लोकांचे आयुष्य वाढते. या संशोधनादरम्यान, कॉफी कमी पित असलेल्या रूग्णांची, कॉफी जास्त पिणाऱ्या रूग्णांशी तुलना करण्यात आली. यातून असे सिद्ध झाले की, कॉफी जास्त पिणाऱ्या रूग्णांना किडनी संबंधीच्या आजारांमुळे असलेला धोका हा 25 टक्क्यांनी कमी झाला.
संशोधकांच्या म्हणण्यानुसार, कॉफी किडनीसंबंधी आजारांमध्ये सुरक्षाकवचाप्रमाणे काम करते. कदाचित याचे मुख्य कारण नायट्रिक अॅसिड असण्याची शक्यता आहे. कॉफीमुळे नायट्रिक अॅसिड नावाचं तत्व शरीरात रिलीज होण्यास मदत होते. हेच तत्व किडनीचं कार्य सुरळीत चालवण्यास मदत करतं.
या संशोधनाचे मुख्य लेखक मिगुल बायगोट वियरा यांनी सांगितले की, संशोधनातून समोर आलेल्या निष्कर्षांमुळे असं समजतं की, जे रूग्ण किडनीच्या आजारांनी पीडित आहेत. त्यांनी जास्तीत जास्त प्रमाणात कॉफीचं सेवन करणं गरजेचं आहे. कारण यांमुळे आजार कमी होऊन आयुष्य वाढण्यास मदत होते.
जर्नल नेफ्रोलॉजी डायलिसिस ट्रांसप्लांटेशनमध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या संशोधनामध्ये 4,863 लोकांबाबतच्या नोंदविलेल्या निरीक्षणांचा अभ्यास करण्यात आला. परंतु संशोधकांनी असंही सांगितलं की, संशोधनातून हे सिद्ध होऊ शकत नाही की, कॅफेनच्या मदतीने किडनीसंबंधित आजार असणाऱ्या रूग्णांच्या मृत्यूचा धोका कमी होतो. पण संशोधनाच्या निष्कर्षानुसार हे सिद्ध होते की, कॉफी पिणं हे किडनीचं आरोग्य चांगलं राखण्यास फायदेशीर असतं.