गेल्या दोन वर्षांपासून संपूर्ण जगामध्ये हाहाकार माजवलेल्या कोरोना विषाणूबाबत एक नवीन अभ्यास समोर आलाय. यात असं दिसून आलंय की, कोरोना विषाणूची सौम्य लक्षणं असलेली सर्दी शरीराला फायदेशीर ठरू (Cold coronavirus Boosts SARS-CoV-2 Immunity) शकते. ज्या लोकांना सर्दी आणि सर्दीसारख्या समस्या उद्भवल्या, त्यांच्यात कोविड -19 विरुद्ध लढण्याची अधिक शक्ती असते. शास्त्रज्ञांनी असा दावा केलाय की, सौम्य लक्षणांचा कोविड किंवा साधी सर्दी ज्यांना होऊन गेलीय, त्या लोकांची प्रतिकारशक्ती (Immunity) इतर कोरोना विषाणूंविरूद्ध मजबूत आहे. या अभ्यासाचे निष्कर्ष जर्नल नेचर कम्युनिकेशनमध्ये (Nature Communication) प्रकाशित झालेत.
या अभ्यासासाठी, SARS cov-2 हा आजार समोर येण्यापूर्वी इतर चार कोरोना विषाणूंच्या विश्लेषणासाठी ८२५ नमुने घेण्यात आले होते. नंतर, SARS-CoV-2 (SARS cov-2) ची लागण झालेल्या 389 लोकांच्या नमुन्यांची देखील सखोल चाचणी (intensive testing) करण्यात आली. ही विश्लेषणं संगणक-आधारित मॉडेल्ससह एकत्रित केल्यानंतर, संशोधकांनी निष्कर्ष काढला की, ही प्रतिपिंडे (antibodies) आक्रमण करणार्या विषाणूला निष्क्रिय करतात. असं आढळून आलंय की, SARS-CoV-2 चे संक्रमण झालेल्या लोकांच्यात या अँटीबॉडीजमुळं कोरोना विषाणूचा हल्ला कमकुवत ठरला.
SARS CoV-2 मुळे कोविड-19 हा आजार होतो. तर, इतर कोरोना विषाणूंमुळे सर्दी, पडसं, खोकला यासारख्या सामान्य समस्या उद्भवतात. ज्या लोकांमध्ये सामान्य कोरोनाविषाणूशी लढण्यासाठी पुरेशा ताकदीची प्रतिपिंडे होती, त्यांना SARS-CoV-2 च्या संपर्कात आल्यानंतरही रुग्णालयात दाखल होण्याचा धोका कमी होता.
झुरिच युनिव्हर्सिटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल व्हायरॉलॉजीच्या प्रमुख अलेक्झांड्रा ट्रकोला म्हणाल्या, 'इतर कोरोनाविषाणूविरूद्ध मजबूत प्रतिकारशक्ती असलेल्या लोकांमध्ये SARS-CoV-2 संसर्गाविरूद्ध काही प्रमाणात बचाव करण्याची क्षमता' आहे.
त्या म्हणाल्या, 'आमच्या अभ्यासातून असं दिसून आलंय की, इतर कोरोना विषाणूंविरूद्ध असलेली मजबूत रोगप्रतिकारक क्षमता SARS-CoV-2 विरुद्धची प्रतिकारशक्तीही मोठ्या प्रमाणात वाढवते. अशा प्रकारे, ज्या लोकांनी निरुपद्रवी कोरोना विषाणूविरूद्ध प्रतिकारशक्ती विकसित झालेल्यांना देखील त्या तुलनेत गंभीर आजार असलेल्या SARS-CoV-2 विरूद्ध चांगलं संरक्षण मिळतं.