नवी दिल्ली : मेडिकल स्टोअर्स किंवा कोणत्याही ऑनलाइन पोर्टलवरून खरेदी केलेली औषधे (Medicine) खरी आहेत की बनावट हे जाणून घेणे सध्या खूप कठीण काम आहे. पण, येत्या काळात तुम्हाला औषधांच्या दर्जाविषयी किंवा गुववत्तेविषयी लगेच माहिती मिळणार आहे. सरकार औषधे बनवणाऱ्या कंपन्यांना त्यांच्या औषधांच्या पॅकेटवर बार कोड किंवा क्यूआर कोड छापणे बंधनकारक करणार आहे.
सुरुवातीला बार कोड किंवा क्यूआर कोड सर्वाधिक विक्री होणाऱ्या 300 ब्रँडवर प्रिंट केला जाईल. बार कोड किंवा क्यूआर कोड प्रिंट केल्यावर, औषध खरेदीदार आपल्या मोबाइलवरून कोड स्कॅन करू शकतो की, ते औषध खरे आहे की बनावट आहे. News18.com ने दिलेल्या वृत्तानुसार, कोणत्याही किंमतीत बाजारात विकल्या जाणाऱ्या बनावट औषधांना आळा घालण्याचा सरकारचा हेतू आहे. या घडामोडीची माहिती असलेल्या एका सरकारी अधिकाऱ्याने News18.com ला सांगितले की, सर्व तयारी पूर्ण झाली आहे आणि येत्या काही आठवड्यांत यासंबंधी अंमलबजावणी केली जाईल.
जगात विकली जाणारी 35 टक्के बनावट औषधे भारतात तयार होतात, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार समजते. येत्या काळात बारकोड छापणे बंधनकारक होणार असल्याने टप्प्याटप्प्याने त्याची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. आधी काही निवडक औषधे बारकोडिंग करून बाजारात आणली जातील आणि त्यानंतर संपूर्ण फार्मा इंडस्ट्रीवर हा नियम लागू केला जाईल. त्यासाठी इंडस्ट्रीशी संबंधित लोकांशी चर्चा केली जात आहे. पहिल्या टप्प्यात 300 ब्रँडची यादी जारी केली जाईल जे क्यूआर कोड किंवा बार कोडचा अवलंब करतील.
या ब्रँड्समध्ये अॅलेग्रा, डोलो, ऑगमेंटिन, सॅरिडॉन, कॅलपोल आणि थायरोनॉर्म या भारतीय फार्मा मार्केटमध्ये सर्वाधिक विकल्या जाणार्या लोकप्रिय औषधांचा समावेश आहे. पहिला टप्पा सुरळीतपणे पूर्ण झाल्यानंतर, त्याच्या पुनरावलोकनानंतर, जवळजवळ सर्व सर्वाधिक विक्री होणाऱ्या औषधांसाठी ते अनिवार्य केले जाईल. सरकार संपूर्ण फार्मा इंडस्ट्रीसाठी एक बार कोड प्रदाता म्हणून केंद्रीय डेटाबेस एजन्सीची शक्यता देखील शोधत आहे.
फॉर्म्युलेशनवर सुद्धा बार कोड आवश्यकजूनमध्ये जारी केलेल्या मसुद्याच्या अधिसूचनेत सरकारने म्हटले होते की, फॉर्म्युलेशन उत्पादनांचे उत्पादक आपल्या प्राथमिक पॅकेजिंग लेबल आणि दुय्यम पॅकेज लेबलवर बार कोड किंवा क्विक रिस्पांस कोड प्रिंट किंवा चिकटवतील. यामध्ये सॉफ्टवेअरद्वारे वाचण्यायोग्य डेटा असणार आहे. या डेटामध्ये एक विशिष्ट उत्पादन ओळख कोड, औषधाचे नाव, ब्रँड नाव, निर्मात्याचे नाव आणि पत्ता, बॅच क्रमांक, उत्पादनाची तारीख, कालबाह्यता तारीख आणि उत्पादन परवाना नंबर असू शकतो. त्यामुळे बनावट औषध बनवणे कठीण होणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम".