मुंबई: उन्हाळा वाढू लागल्याने माठांची मागणीही वाढली आहे. त्यामुळे माठांच्या किमतीही वाढल्या आहेत. सध्या शहरात खोकला आणि घसा दुखण्याचे आजार बळावत असताना फ्रिजचे पाणी पिण्यास आपण धजावत नाही. त्यामुळे गरिबांचा फ्रिज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माठाचा पर्याय हा अतिउत्तम ठरू शकतो. ज्याचा आरोग्यालाही तितकाच फायदा होत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
फ्रिजच्या पाण्याने वजन वाढते फ्रिजमधील पाण्याने तात्पुरती तहान भागत असली तरी ते पिऊन आरोग्याचे नुकसानच होते. कारण, माठातले पाणी नैसर्गिक तर फ्रिजमधील पाणी कृत्रिमरीत्या गार केले जाते. त्याने घशातील ग्रंथींना सूज येते. आतड्यांवर परिणाम होऊन ते आकुंचन पावतात. त्यांचे काम नीट न झाल्याने पोट साफ होण्यास अडथळा येऊन बद्धकोष्ठता होते. पचन न झाल्याने पेशी आकुंचित पावून चयापचय बिघडते. परिणामी वजनही वाढू शकते.
माठातील पाणी आरोग्यासाठी योग्य...
मानवी शरीर आम्लयुक्त तर मातीचे भांडे निसर्गतः अल्कधर्मी आहे. या दोन्हीच्या मिश्रणामुळे शरीरात संतुलित पीएच (हायड्रोजनची क्षमता) पातळी तयार होते. विविध विषाणूजन्य किंवा जीवाणूजन्य आजारांवर अंकुश ठेवण्यासाठी आवश्यक पीएचची पातळी ७.३५-७.४५ च्या मानकामधून विचलित झाल्यास आजार बळावतात. त्यामुळे माठातील पाणी शरीरासाठी योग्य असल्याचे डॉक्टर सांगतात.
...म्हणून माठातीलच पाणी प्या-
- माठातील पाण्याने रक्तदाब नियंत्रित राहतो.
- बॅड कोलेस्टॉल कमी होत हृदयविकाराचा धोका कमी होतो.
- मातीत सूज आणि दाहविरोधी गुणधर्म असतात.
- या गुणधर्मामुळेच माठातील पाणी प्यायल्याने स्नायूचा आखडलेपणा, सूज कमी होते.
संधिवातासारख्या त्रासात माठातलं पाणी प्यायल्याने आराम मिळतो. शरीरातील लोहाच्या कमतरतेने असलेला अॅनेमियाचा धोकाही दूर होतो. तसेच त्वचेशी निगडित आजार म्हणजे मुरुम, पुटकुळ्या, फोड जाऊन त्वचा उजळ होते.