सोयाबीन तेलाचा वापर खाण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. या तेलाचा मेंदूवर कसा प्रभाव पडतो यावर अमेरिकेत नुकताच रिसर्च करण्यात आला. सोयाबीनच्या तेलाने केवळ लठ्ठपणा आणि डायबिटीसच नाही तर ऑटिज्म, अल्झायमर आणि डिप्रेशनसारख्या समस्यांचा धोका आढळून आला आहे.
अमेरिकेतील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या अभ्यासकांनुसार, उंदरांवर करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार मेंदूच्या हायपोथेलेमस भागावर सोयाबीन तेलाचा स्पष्टपणे प्रभाव आढळून आलाय. मेंदूच्या याच भागात हार्मोन रिलीज होण्यासोबतच इतरही महत्वाच्या प्रक्रिया होतात. अभ्यासकांना सोयाबीन तेलाने साधारण १०० जीन प्रभावित झाल्याचे आढळून आले.
अभ्यासक पूनमजोत देओल म्हणाले की, 'रिसर्चच्या या निष्कर्षावरून हेल्दी तेल तयार करण्यास मदत मिळू शकते. मी लोकांना सोयाबीनच्या तेलाचा वापर कमी करण्याचा सल्ला देते'. या रिसर्चनुसार, सोयाबीन तेलाचा वापर फास्ट फूड तयार करण्यासाठी, तळणासाठी अधिक केला जातो. हे तेल पॅकेटमधील पदार्थांसाठी वापरलं जातं आणि जगातल्या अनेक भागात जनावरांना देखील दिलं जातं.
इंडोक्रायनोलॉजीमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, उंदरांना तीन ग्रुपमध्ये विभागून त्यांना तीन प्रकारचा चरबीयुक्त आहार देण्यात आला. एका समुहाला सोयाबीनचं तेल, दुसऱ्या समुहाला लिनोलेइक अॅसिड सोयाबीन तेल आणि तिसऱ्यांना खोबऱ्याचं तेल दिलं गेलं. सोयाबीनचं तेल सेवन केल्याने लठ्ठपणा, मधुमेह, इन्सुलिन आणि फॅटी लिव्हरची समस्या वाढलेली आढळून आली.