नवी दिल्ली - आतापर्यंत अनावश्यक गर्भधारणा टाळण्यासाठी महिलांसाठी गर्भनिरोधक गोळ्या होत्या. मात्र शास्त्रज्ञ पुरुषांसाठीही गर्भनिरोधक गोळ्या बनवण्यात गुंतले आहेत. या संशोधनात त्यांना मोठे यश मिळाले आहे. शास्त्रज्ञांनी अशी एक गोळी बनवली आहे जी उंदरांवर यशस्वी झाली आहे. आता प्रीक्लिनिकल मॉडेलमध्ये या प्रयोगाची पुनरावृत्ती केल्यानंतर त्यांची क्लिनिकल चाचणी मानवांवर केली जाणार आहे.
महिलांच्या गर्भनिरोधक गोळ्यांप्रमाणेच यामध्ये शास्त्रज्ञांनी एक गर्भनिरोधक औषध विकसित केले आहे ज्याचा प्रयोग उंदरांवर करण्यात आला आहे. या औषधाने उंदरांमधील शुक्राणूंना तात्पुरते बंद केले त्यामुळे मादी उंदराची गर्भधारणा रोखली गेली. अमेरिकेतील वेल कॉर्नेल मेडिसिनच्या संशोधकांनी सांगितले की, आतापर्यंत पुरुषांसाठी गर्भनिरोधक पर्याय म्हणजे केवळ कंडोम आहे. पूर्वी पुरुषांसाठी बनवल्या जाणाऱ्या गर्भनिरोधक गोळ्यांवरील संशोधन बंद करण्यात आले कारण त्यांचे अनेक दुष्परिणाम समोर आले होते असं संशोधकांचे म्हणणे आहे.
या स्टडी रिपोर्टचे सह-वरिष्ठ लेखक लोनी लेव्हिन आणि जोचेन बक यांच्या टीमला असं आढळून आले की, उंदरांमध्ये सोल्युबल एडेनाइल सायक्लेस (sAC) नावाच्या मुख्य सेल्युलर सिग्नलिंग प्रोटीनची अनुवांशिकदृष्ट्या कमतरता आहे. तर एसएसी इनहिबिटर, टीडीआय -11861 च्या एका डोसने उंदरांच्या शुक्राणूंना अडीच तासांपर्यंत स्थिर केले. संभोगानंतरही मादी प्रजनन मार्गावर उंदराचे शुक्राणू निष्क्रिय होते असं जर्नल नेचर कम्युनिकेशन्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासात दिसून आले.
संशोधकांनी सांगितले की, तीन तासांनंतर काही शुक्राणूंची गतिशीलता परत आली आणि २४ तासांनंतर जवळजवळ सर्व शुक्राणू सामान्य स्थितीत आले. TDI-11861 चा डोस दिलेल्या नर उंदरांना मादी उंदरासोबत ठेवण्यात आले. उंदीरांनी सामान्य पद्धतीने संभोग केला परंतु ५२ स्वतंत्र संभोग करूनही मादी उंदरांची गर्भधारणा झाली नाही. 'आमची ही गोळी ३० मिनिटांपासून तासाभरात काम करते. इतर गर्भनिरोधकांना शुक्राणूंची संख्या कमी करण्यासाठी किंवा अंडी फलित करण्यास असमर्थ ठरण्यासाठी एक आठवडा लागतो असं संशोधक म्हणाले.
sAC इनहिबिटर गोळ्यांचा प्रभाव फार काळ टिकत नाही आणि पुरूष जेव्हा त्यांना गरज असेल तेव्हाच ते घेतात. यामुळे पुरुषांना त्यांच्या प्रजनन क्षमतेबाबत दैनंदिन निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य मिळेल. संशोधकांच्या टीमने या गोळ्यांची उंदरांवर यशस्वी चाचणी केली आहे आणि आता ते मानवांवर तिच्या चाचणीवर काम करत आहेत. संशोधक आता वेगळ्या प्रीक्लिनिकल मॉडेलमध्ये हा प्रयोग पुन्हा करतील. यानंतर, या औषधाची मानवांवर क्लिनिकल चाचणी सुरू होईल. चाचणी यशस्वी झाल्यास पुरुषांसाठी गर्भनिरोधक गोळी बाजारात येईल असं लेव्हिन म्हणाले.